ट्वेंटी-20, वन डे आणि आता कसोटी.... भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या कसोटी मालिकेची सर्वांना उत्सुकता लागली आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा हे सलामीवीर न्यूझीलंड दौऱ्यात खेळणार नसल्यानं कसोटी मालिकेत सलामीला येण्याची संधी कोणाला मिळणार, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं काम सुरू झालं आहे. पृथ्वी शॉ आणि शुबमन गील यांच्यात दुसऱ्या सलामीवीराच्या जागेसाठी चुरस रंगणार आहे. 

भारतीय संघानं मागील सात कसोटी सामन्यांत विजय मिळवले आहेत. आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत टीम इंडिया 360 गुणांसह सध्या आघाडीवर आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेला सामोरे जाण्यापूर्वी टीम इंडियाचं मनोबल नक्कीच उंचावलेलं असेल. पण, दुखापतींचे सत्र संघाच्या मागे कायम असल्यानं कर्णधार विराट कोहलीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत अंतिम अकरामध्ये कोणाला स्थान द्यावं, असा पेच निर्माण झाला आहे. 

मयांक हा सलामीसाठी एक पर्याय असला तरी वन डे मालिकेत त्याला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. तीन सामन्यांत त्यानं 31, 3 आणि 1 धाव केली. मयांकसोबत कसोटीत डावाची सुरुवात करण्यासाठी पृथ्वी आणि शुबमन हे दोन पर्याय आहेत. पृथ्वीच्या नावावर दोन कसोटी सामने आहेत आणि त्यात त्यानं पदार्पणात शतकही झळकावले आहे. 2018-19च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तो कसोटी सलामीला येण्यासाठी सज्ज होता. पण, त्याला दुखापतीमुळे त्या दौऱ्यातून माघारी फिरावे लागले. शुबमनचे कसोटी पदार्पण झालेले नाही, परंतु त्यानं भारत अ संघाचे प्रतिनिधित्व करताना न्यूझीलंड अ विरुद्धच्या अनौपचारिक सामन्यांत 83, 204* आणि 136 धावा कुटल्या आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरू होणाऱ्या सराव सामन्यात मयांकसोबत कोणाला संधी मिळते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.


गोलंदाजीत इशांत शर्मा सराव सामन्यात खेळणार नाही. रणजी करंडक सामन्यात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे तो कसोटी मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. तंदुरुस्त चाचणीनंतरच त्याचा फैसला होईल. अशात जसप्रीत बुमराहवर सर्वाधिक जबाबदारी असणार आहे. ऑगस्ट-सप्टेंबर 2019नंतर बुमराह पहिल्यांदाच रेड बॉल सामना खेळणार आहे. ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेतील निराशाजनक कामगिरी विसरून बुमराहला सराव सामन्यात कमबॅक करण्याची संधी आहे. उमेश यादव, नवदीप सैनी आणि मोहम्मद शमी हे पर्याय उपलब्ध आहेत. 


अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांनी अनौपचारिक सामन्यांत साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे विराटसह मधल्या फळीची जबाबदारी त्यांच्यावर असेल. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांच्यावर फिरकीची जबाबदारी असेल.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 21 ते 25 फेब्रुवारी, पहाटे 4 वा.
भारत विरुद्ध न्यूझीलंड - 29 फेब्रुवारी ते 4 मार्च, पहाटे 4 वा.
 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कर्णधाराचा नव्हता आधार, म्हणून झटक्यात गायब झाले टीम इंडियाचे 'हे' शिलेदार!

IPL 2020 : RCB च्या परस्पर निर्णयावर कर्णधार विराट कोहली नाराज? युजवेंद्र चहलनंही विचारला सवाल

Video : 3 विकेट्स, 5 धावा! आफ्रिकेनं अखेरच्या षटकात इंग्लंडवर मिळवला थरारक विजय

अबब! १९२ कोटींचा घटस्फोट? ७ वर्षांच्या संसारानंतर दिग्गज खेळाडूनं घेतला काडीमोड

...म्हणून रोहित शर्मा तीन दिवस रडला होता; हिटमॅननं सांगितला Emotional किस्सा

 

Web Title: New Zealand vs India : Prithvi Shaw or Shubman Gill, and other questions India face ahead of warm-up game

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.