न्यूझीलंड अ संघानं रविवारी भारत अ संघावर रोमहर्षक विजय मिळवून अनऑफिशीयल वन डे मालिका 2-1 अशा फरकानं जिंकली. न्यूझीलंड अ संघानं प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 7 बाद 270 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना अखेरच्या षटकात कायले जॅमीसननं सलग दोन विकेट घेत भारताचा डाव 265 धावांवर गुंडाळला. भारताला अवघ्या पाच धावांनी हा सामना गमवावा लागला.
प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड अ संघानं दोन्ही सलामीवीर झटपट गमावले. दुसऱ्या वन डे सामन्यात शतक झळकावणारा जॉर्न वर्कर सहा धावांवर माघारी परतला, तर राचीन रवींद्रही एक धाव करून बाद झाला. त्यानंतर ग्लेन फिलिपनं 35 धावा केल्या. टॉम ब्लंडलने 37 धावा करून किवींचा डाव सावरला. पण, मार्क चॅपमॅननं 98 चेंडूंत नाबाद 110 धावा कुटून संघाला सामाधानकारक पल्ला गाठून दिला. टोड अॅस्टलनेही 65 चेंडूंत 56 धावा केल्या. इशान पोरेलनं तीन, तर राहुल चहरनं दोन विकेट घेतल्या. संदीप वॉरियर आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना पृथ्वी शॉनं दमदार खेळ केला. त्यानं 38 चेंडूंत 55 धावा चोपल्या. त्यात 8 चौकार व एका षटकाराचा समावेश होता. ऋतुराज गायकवाडनेही 44 धावा केल्या, तर मयांक अग्रवालनं 24 धावा केल्या. सूर्यकुमार यादव ( 5), विजय शंकर ( 19) आणि कृणाल पांड्या ( 7) यांना अपयश आलं. पण, इशान किशननं खिंड लढवली. त्यानं नाबाद 71 धावा करताना संघाच्या विजयाच्या आशा कायम राखल्या होत्या. त्याला अक्षर पटलेनं 28 चेंडूंत 32 धावा करताना उत्तम साथ दिली. पण, अवघ्या पाच धावांनी भारत अ संघाला हार मानावी लागली.
![]()
भारत अ आणि न्यूझीलंड अ यांच्यातल्या दोन अनऑफिशीयल कसोटी मालिकेला 30 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.