कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासोबत मतभेद असल्याचे वृत्त ही निव्वळ अफवा असल्याचे सांगून माझ्या कार्यकाळात खेळाडू आणि प्रशासकांना पारखण्याचे मापदंड ‘कामगिरी’हेच असल्याचे बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली यांनी जोर देत सांगितले.
शास्त्री- गांगुली यांच्यातील मतभेद २०१६ ला चव्हट्यावर आले. त्यावेळी शस्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज केला होता. गांगुली त्यावेळी क्रिकेट सल्लागार समितीत असल्याने अनिल कुंबळे यांची मुख प्रशिक्षकपदी नियुक्ती केली होती. वर्षभरानंतर कर्णधार विराट कोहलीसोबतच्या मतभेदामुळे कुंबळे यांनी पद सोडताच शास्त्री यांची या पदावर वर्णी लागली होती. शास्त्रीसोबत मतभेद असल्याचे वृत्त केवळ अफवा असल्याचे गांगुली म्हणाले. भूतकाळातील मतभेदांमुळे शास्त्री यांच्याबाबत आकस आहे काय, असे विचारताच गांगुली म्हणाले,‘ माझ्याकडे या प्रश्नाचे उत्तर नाही.’
‘चांगली कामगिरी करा, पदावर कायम रहा’हे अपाले धोरण असल्याचे सांगून गांगुली म्हणाले,‘तुमची कामगिरी खराब झाल्यास अन्य खेळाडू जागा घेतील. मी खेळत असतानाही हाच नियम होता. अफवा ऐकायला मिळती आणि गौप्यस्फोटही होत राहतील पण लक्ष मात्र २२ यार्डदरम्यान असायला हवे.’ विराट आणि सचिनसारख्या खेळाडूंचे उदाहरण देत कामगिरी महत्त्वपूर्ण असून त्याला पर्याय नसल्याचे गांगुली यांनी स्पष्ट केले. बीसीसीआयची धुरा सांभाळल्यानंतर पत्रकार परिषदेत गांगुली यांनी टी२० विश्वचषकात आपली जागा संघात पक्की आहे, असा विचार मनात ठेऊन कुणी खेळू नये, असा सल्ला खेळाडूंना दिला. (वृत्तसंस्था)