मुंबई इंडियन्सनं ( Mumbai Indians) सलग दोन विजय मिळवताना आयपीएल २०२१च्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध MIनं गमावलेले सामने खेचून आणले. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, राहुल चहर आणि कृणाल पांड्या या चौकडीनं अखेरच्या षटकांत टिच्चून मारा करताना प्रतिस्पर्धी संघांना गुडघे टेकण्यास भाग पाडले. पण, आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) यानं एकही षटक न फेकल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
हार्दिक पांड्या खांद्याच्या दुखापतीमुळे काही काळ क्रिकेटपासून दूर होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर तो विश्रांतीवर होता आणि त्यानंतर कसून सराव करताना त्यानं पुनरागमन केले खरे, परंतु अजुनही तो पूर्णपणे बरा झालेला नाही.
मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने ( head coach Mahela Jayawardene) यांनी सांगितले की,''त्याच्याबाबतीत आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही तो पूर्णपणे बरा होत नाही आणि त्याला स्वतःला तसे वाटत नाही, तोपर्यंत यंदाच्या आयपीएलमध्ये तो गोलंदाजी करणार नाही.''
''मागील पर्वात तो दुखापतीतून सावरत खेळला होता आणि या पर्वात त्याच्याकडून गोलंदाजीची आम्हाला अपेक्षा होती. पण इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याची दुखापत पुन्हा बळावली. त्यामुळे सध्याच्या घडीला त्यावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत. आम्हाला कोणताही धोका पत्करायचा नाही,''असेही जयवर्धने यांनी स्पष्ट केले.
''पुढील काही आठवड्यांत तो गोलंदाजी करताना दिसेल, अशी आशा आहे. त्याच्याकडून जबरदस्तीनं गोलंदाजी करून घ्यायची नाही. पण, तो पूर्णपणे बरा होईल, तेव्हा त्याच्या गोलंदाजीचा आम्ही वापर करून घेऊ,''असेही ते म्हणाले.