सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेदरम्यान आलेल्या एका बातमीमुळे भारतीय क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. आसाम क्रिकेट संघामधील चार क्रिकेटपटूंवर भ्रष्टाचाराच्या कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे गंभीर आरोप झाले आहेत. आसाम क्रिकेट संघटनेने या प्रकरणी कठोर पावलं उचलत या चार क्रिकेटपटूंवर निलंबनाची कारवाई केली आहे.
आसाम क्रिकेट संघटनेने निलंबनाची कारवाई केलेल्या क्रिकेटपटूंमध्ये अमित सिन्हा, ईशाान अहमद, अमन त्रिपाठी आणि अभिषेक ठकुरी यांचा समावेश आहे. २६ ते ८ डिसेंबरदरम्यान, लखनौ येथे झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेच्या सामन्यांमध्ये सहभाही झालेल्या आसामच्या संघातील खेळाडूंना प्रभावित करण्याचा आणि गैरकृत्यामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका या खेळाडूंवर ठेवण्यात आला आहे.
आसाम क्रिकेट संघटनेचे सचिव सनातन दास यांनी १२ डिसेंबर रोजी याबाबत आपली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन गुवाहाटी क्राईम ब्रँचमध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्याबरोबरच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अँटी करप्शन अँड सिक्युरिटी युनिटनेही या प्रकरणाचा प्राथमिक तपास केला आहे. तसेच त्यामध्ये सापडलेल्या पुराव्यांमधून या खेळाडूंचा या प्रकरणात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे खेळाची निष्पक्षता आणि विश्वसनीयतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
दरम्यान, निलंबित करण्यात आलेल्या खेळाडूंमधील अभिषेक ठकुरी हे नाव सर्वाधिक चर्चेतील आहे. त्याने या हंगामात आसामसाठी १२ प्रथमश्रेणी, ११ लिस्ट-ए आणि १० टी-२० सामने खेळले होते.