KL Rahul Captaincy, IND vs ENG 1st Test: इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात शुबमन गिलच्या (Shubman Gill) भारतीय संघाला पाच विकेट्सनी पराभव पत्करावा लागला आहे. इंग्लंड संघाने ३७१ धावांचे लक्ष्य गाठून नवा इतिहास रचला. या सामन्याच्या शेवटच्या दिवशी इंग्लिश फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांना नाकीनऊ आणले आणि जलद धावा काढल्या. सलामीवीरांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यावरून असे वाटत होते की इंग्लंड हा सामना १० विकेट्सने जिंकेल. पण यादरम्यान मैदानावर असे काही घडले, ज्यामुळे सारेच आश्चर्यचकित झाले. भारतीय संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू केएल राहुलने संघाची सूत्रे हाती घेतली आणि कर्णधारपदाची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. त्याचा परिणाम दुसऱ्या सत्रात दिसून आला.
केएल राहुल कर्णधार झाला तेव्हा...
लीड्स कसोटीच्या पाचव्या दिवशी इंग्लंडने आपला दुसरा डाव बिनबाद २१ वरून पुढे सुरु केला. बेन डकेट आणि जॅक क्रॉली या सलामी जोडीने वेगाने धावा काढायला सुरुवात केली. यादरम्यान, मैदानावर एक वेगळीच घटना घडली. टीम इंडियाचा सर्वात अनुभवी खेळाडू केएल राहुल मैदानावर फिल्डिंग सेट करताना दिसला. पहिल्या सत्रात त्याचा फलंदाजांवर फारसा परिणाम झाला नाही, परंतु दुसऱ्या सत्रात पाऊस थांबल्यानंतर खेळ सुरू होताच केएल राहुलने पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. त्याचा परिणाम दिसून आला. प्रसिद्ध कृष्णाच्या चेंडूवर केएल राहुलने स्लिपमध्ये जॅक क्रॉलीला झेलबाद केले. यामुळे १८८ धावांची भागीदारी तुटली आणि टीम इंडियाच्या आशा पल्लवित झाल्या. प्रसिद्ध कृष्णाच्या पुढच्याच षटकात पहिल्या डावातील शतकवीर ओली पोप देखील क्लीन बोल्ड पॅव्हेलियनमध्ये परतला. हे सर्व केएल राहुलच्या नेतृत्वाखाली घडले. इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन यानेही यावर मत मांडले.
----
नासिर हुसेन काय म्हणाला?
लीड्स कसोटी सामन्यात समालोचन करताना नासीर हुसेन म्हणाला, "जर तुम्ही आता मैदानाकडे पाहिले आणि विचारले की कोण कर्णधार आहे, तर उत्तर केएल राहुल असेल. यावेळी तो क्षेत्ररक्षण सेट करत आहे. त्याचा परिणामही दिसून येतो आहे." केएल राहुलकडे गिल आणि ऋषभ पंतपेक्षा जास्त कर्णधारपदाचा अनुभव आहे. त्याने सर्व फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे. रवींद्र जाडेजानंतर तो संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. तसेच मालिका सुरू होण्यापूर्वीच केएल राहुलने सांगितले होते की तो गिलला मदत करेल.
Web Title: KL Rahul takes captaincy from Shubman Gill India get two quick wickets IND vs ENG 1st Test
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.