सध्याच्या घडीला भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. एक तर त्यांची पराभवाची मालिका संपताना दिसत नाही. वनडे मालिकेनंतर आता पहिला कसोटी सामनाही त्यांना गमवावा लागला. त्याचबरोबर कर्णधार विराट कोहलीचा फॉर्मही चांगला नाही. आता तर भारताचे माजी विश्वविजेते कर्णधार विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले.
यजमान न्यूझीलंड संघानं पहिल्या कसोटीत दहा विकेट्स राखून दणदणीत विजयाची नोंद करताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचा किवी गोलंदाजांसमोर निभाव लागला नाही. टीम साऊदी, कायले जेमिसन आणि ट्रेंट बोल्ट या त्रिकुटानं तर टीम इंडियाची दाणादाण उडवली. त्यात दुसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडच्या ताफ्यात प्रभावी मारा करणारा नील वॅगनर दाखल झाला आहे. 29 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला रोखण्यासाठी खास 'मास्टर प्लान' तयार केला आहे.

टीम इंडिया मालिका वाचवण्याचं लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून 29 फेब्रुवारीला मैदानावर उतरणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडच्या संघात नील वॅगनरचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत वॅगनरने त्याच्या भेदक व आखूड माऱ्यानं वर्चस्व गाजवले होते. आता तो टीम इंडियाच्या फलंदाजांना सतावण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यानं आतापर्यंत 47 कसोटी सामन्यांत 26.63 च्या सरासरीनं 204 विकेट्स घेतल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्यानं तीन सामन्यांत 17 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आता टीम इंडियाचीही डोकेदुखी वाढणार आहे.
कपिल देव कोहली आणि संघ व्यवस्थापनावर चांगलेच भडकलेले दिसत आहेत. यावेळी कपिल म्हणाले की, " भारतीय संघाचं नेमकं काय चाललंय? कारण जवळपास प्रत्येक संघात संघामध्ये बदल पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर जे खेळाडू फॉर्मात आहेत त्यांना संधी मिळायला हवी. आता लोकेश राहुल हा चांगल्या फॉर्मात आहे, पण त्याला संघात स्थान का देण्यात येत नाही. या साऱ्या गोष्टी अनाकलनीय आहे."
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत कोहलीला दोन डावांत 2 व 19 धावा करता आल्या होत्या. त्याव्यतिरिक्त न्यूझीलंड दौऱ्यातील सात मर्यादित षटकांच्या सामन्यांत त्याला केवळ एकच अर्धशतक झळकावता आले आहे. कोहलीचा फॉर्म हा टीम इंडियासाठी चिंतेचा विषय आहे आणि त्याला रोखल्यास टीम इंडियावर वर्चस्व गाजवता येते, याची जाण किवींना आहे. त्यामुळे त्यांनी कोहलीसाठी प्लान तयार केला आहे.

वॅगनरने कसोटी क्रिकेटच्या सहा डावांमध्ये कोहलीला तीनवेळा बाद केले आहे. वॅगनरने टाकलेल्या 108 चेंडूंवर कोहलीनं 20 च्या सरासरीनं 60 धावा केल्या आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत या दोघांधील द्वंद्व पाहण्याची उत्सुकता आहे.
''प्रतिस्पर्धी संघाच्या सर्वात यशस्वी खेळाडूला लक्ष्य करण्याचा माझा प्रयत्न असतो. कारण, प्रतिस्पर्धींच्या महत्त्वाच्या खेळाडूला रोखल्यास संघच कमकुवत होतो, याची जाण आहे. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत कोहली माझ्या रडारवर असणार आहे. त्याला धावा करण्यापासून रोखून दडपण निर्माण करण्याची माझी रणनीती असेल. सहकारी गोलंदाजही हीच रणनीती वापरणार आहेत,'' असे वॅगनरने सांगितले.
Web Title: Kapil Dev, enraged at Virat Kohli, said ...prl
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.