प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि प्रतिभावान फलंदाज पृथ्वी शॉ यांचे टीम इंडियात लवकरच कमबॅक होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) तसे संकेत दिले आहेत. बुमराह सध्या तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे, तर पृथ्वीही निलंबनानंतर पुनरागमन करताना मैदान गाजवत आहे. गेले काही महिने हे दोघेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहेत. डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यामुळे पृथ्वीला 8 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते, तर बुमराह ऑगस्ट महिन्यापासून दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहे. त्यामुळे आगामी न्यूझीलंड दौऱ्यातून टीम इंडियात कमबॅक करण्याचा त्यांचा निर्धार आहे आणि त्याच दौऱ्यासाठीच्या तंदुरुस्ती चाचणीसाठी बीसीसीआयनं दोघांना बोलावले आहे.
20 वर्षीय पृथ्वीनं रणजी करंडक स्पर्धेत बडोदा संघाविरुद्ध द्विशतकी खेळी केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील त्याचे हे पहिलेच द्विशतक ठरले. त्यानं 179 चेंडूंत 202 धावा कुटल्या. तत्पूर्वी सय्यद मुश्ताक अली ट्वेंटी-20 स्पर्धेतही त्यानं जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे तो टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी उत्सुक आहे. दुसरीकडे बुमराहही तंदुरुस्तीसाठी कसून मेहनत घेत आहे. भारत विरुद्ध वेस्ट इंडिज वन डे मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात तो नेट बॉलर म्हणून मैदानावर उतरणार आहे. 
''दुखापतीतून सावरत असलेल्या खेळाडूंना बोलावून त्यांच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्याचं काम बीसीसीआय नेहमी करते आणि हा त्याचाच बाग आहे. बीसीसीआयच्या फिजिओ आणि ट्रेनरकडून त्यांची चाचपणी केली जाईल,'' असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले.
वेस्ट इंडिज मालिकेनंतर भारतीय संघ मायदेशात श्रीलंका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. त्यानंतर टीम इंडिया न्यूझीलंड दौऱ्यावर रवाना होणार आहे. तेथे 5 ट्वेंटी-20, 3 वन डे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे.