आयर्लंड क्रिकेट संघानं गुरुवारी आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धक्कादायक निकालाची नोंद केली. त्यांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप विजेत्या संघाला अवघ्या 4 धावांनी हार मानण्यास भाग पाडले. शिवाय त्यांच्या सलामीवीरांनी पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी करताना विक्रमालाही गवसणी घातली. त्या जोरावर आयर्लंडनं 208 धावांचा डोंगर उभा केला आणि तो पार करताना वर्ल्ड कप विजेत्या संघांला चार धावा कमी पडल्या. आयर्लंडच्या फलंदाजांनी 12 षटकार व 13 चौकार मारले. आयर्लंडच्या सालामीवीरांनी पहिल्या सहा षटकांत 93 धावा चोपून विश्वविक्रम केला. आता हा वर्ल्ड कप विजेता संघ कोणता ते जाणून घेऊया...
वन डे मालिकेत सपाटून मार खाल्यानंतर आयर्लंड संघानं ट्वेंटी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दणदणीत विजय मिळवताना वेस्ट इंडिजला पराभवाची चव चाखवली. प्रथम फलंदाजीला आलेल्या आयर्लंडनं 7 बाद 208 धावा केल्या. पॉल स्टिर्लिंग आणि केव्हीन ओ'ब्रायन यांनी पहिल्या विकेटसाठी 154 धावांची भागीदारी केली. त्यांनी सहा षटकांत 93 धावा चोपून काढल्या. 13व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर ही भागीदारी तोडली. ओ'ब्रायन 32 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकार खेचून 48 धावांवर ड्वेंन ब्राव्होच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर आयर्लंडचा डाव गडगडला. पण, स्टिर्लिंगनं खिंड लढवली. त्यानं 8 षटकार व 6 चौकारांसह 95 धावा चोपल्या.
लक्ष्याचा पाठलाग करताना
वेस्ट इंडिजचा सलामीवीर लेंडल सिमन्स ( 22) लगेच माघारी परतला. त्यानंतर छोटी खेळी करत अन्य फलंदाजांचं तंबूत परतण्याचं सत्र सुरू होतं. एव्हीन लुईसनं 29 चेंडूंत 6 चौकार 3 षटकार खेचून 53 धावा केल्या. किरॉन पोलार्ड ( 31), शिमरोन हेटमायर ( 28), निकोलस पुरण ( 26), शेर्फान रुथरफोर्ड ( 26) यांना मोठी खेळी साकारता आली नाही. अखेरच्या षटकात विजयासाठी 13 धावांची गरज असताना जोश लिटलनं पहिल्याच चेंडूवर रुथरफोर्डला माघारी पाठवले. त्यानंतर आलेल्या ड्वेन ब्राव्होनं खणखणीत षटकार खेचून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. तीन वर्षांनंतर तो पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. त्यानं दोन चेंडूंत पाच धावा, असा सामना आणला, परंतु पाचव्या चेंडूवर लिटलनं त्याला बाद केले आणि अखेरच्या चेंडूवर विंडीजला पाच धावा करता आल्या नाही.
![]()