Gujarat Titans vs Lucknow Super Giants, 64th Match : प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट झालेल्या लखनौच्या संघाने घरच्या मैदानात खेळणाऱ्या आणि क्वालिफायर १ खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या गुजरात टायटन्सला पराभवाचा धक्का दिला आहे. मिचेल मार्श ११७ (६४) चे दमदार शतक आणि निकोलस पूरन ५६ (२७) याच्या अर्धशतकाच्या जोरावर लखनौच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना निर्धारित २० षटकात २ विकेट्सच्या मोबदल्यात २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना साई सुदर्शन २१ (१६), शुबमन गिल ३५ (२०) आणि जोस बटलर ३३ (१८) हे तिघे पहिल्यांदाच १० षटकांच्या आत माघारी फिरले. या परिस्थितीत लखनौच्या संघाच्या मध्यफळीची खरी कसोटी होती. पण त्यात फक्त शाहरुख खान अर्धशतकी खेळीसह काटावर पास झाला. पण बाकी सर्व नापास झाल्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाने हा सामना गमावला. या सामन्यातील पराभवामुळे पहिल्या दोनमध्ये टिकून राहण्याचं मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर उभे राहिले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
LSG च्या ताफ्यातून मार्शचं शतक, पूरनने अर्धशतकासही लुटली मैफिल
शुबमन गिल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण त्याचा हा निर्णय मार्करम मिचेल मार्श जोडीनं चुकीचा ठरवला. लखनौच्या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी ९१ धावांची दमदार भागीदारी रचली. मार्करम २४ चेंडूत ३६ धावा करून माघारी फिरल्यावर मिचेल मार्श अन् निकोलस पूरन ही जोडी जमली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी केली. मिचेल मार्शनं ६४ चेंडूत १० चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने ११७ धावांची खेळी केली. तो यंदाच्या हंगामात शतक झळकवणारा पहिला परदेशी खेळाडू ठरला. निकोल पूरनने २७ चेंडू केलेल्या नाबाद ५६ धावांच्या खेळीसह पंतने ६ चेंडूत केलेल्या १६ धावांच्या जोरावर लखनौच्या संघाने २ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर २३५ धावा लावल्या होत्या.
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं! आधी थोरल्यानं मग धाकट्या भावानंही मारली सेंच्युरी
GT च्या ताफ्यातून यंदाचा हंगाम गाजवणारे तिघेही स्वस्तात परतले तंबूत
या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची फार्मात असलेली जोडी स्वस्तात आटोपली. साई सुदर्शन १६ चेंडूत २१ धावा करून बाद झाला. कर्णधार शुबमन गिलनं २० चेंडूत ३५ धावा करून मैदान सोडलं. सलामी जोडीशिवाय फॉर्ममध्ये असलेला बटलरही १८ चेंडूत २२ धावा करून परतला. यंदाच्या हंगामात या तिघांनीच प्रत्येक सामना सेट केल्याचे पाहायला मिळाले. पण लखनौविरुद्ध ही तिघे लवकर बाद झाल्यावर मध्यफळीतील अन्य फलंदाजींची खरी कसोटी होती.
मध्यफळीत शाहरुखसह रुदरफोर्डनं ताकद दाखवली, पण ती कमीच पडली
आघाडीचे स्टार स्वस्तात परतल्यावर शाहरुख खान आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनी मध्यफळीत आश्वासक खेळी केली. पण त्यांची कामगिरी सामन्यात ट्विस्ट आणू शकली नाही. रुदरफोर्ड २८ चेंडूत ३८ धावा करून बाद झाला. त्यानंतर शाहरुख खान एकटा पडला. त्याने जोर लावला. पण शेवटी २९ चेंडूत ५७ धावांवर त्याची खेळीही संपली. संघाला विजयापर्यंत नेऊ न शकल्यामुळे मध्यफळीसाठी जी परीक्षा होती त्यात तो काटावर पास झालाय असेच म्हणावे लागेल. याशिवाय अन्य फलंदाजांनी नांगी टाकली. यात राहुल तेवतियासह अर्शद खानचा समावेश होता.
GT चं टेन्शन वाढलं..
या सामन्यातील विजयासह उर्वरित सर्व सामने जिंकून गुजरात टायटन्सकडे २२ गुण मिळवत प्लेऑफ्समध्ये टॉपला राहण्याची संधी होती. पण लखनौ विरुद्धच्या पराभवामुळे त्यांचे टेन्शन वाढले आहे. आता ते फक्त २० गुणांपर्यंत पोहचू शकतात. दुसरीकडे बंगळुरु आणि पंजाब हे दोन संघ उर्वरित दोन सामने जिंकून गुजरात टायटन्सच्या पुढे निघून जाऊ शकतात. जर या दोन संघांनी एखादा सामना गमावला तरच गुजरातला अव्वल दोनमध्ये राहून क्वालिफायर १ मध्ये खेळता येईल.
Web Title: IPL 2025 GT vs LSG Lucknow Super Giants won by 33 runs Against Gujarat Titans Shahrukh Khan Fifty But
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.