IPL 2021: नाव बदलणारा पंजाब किंग्स भाग्य बदलण्यासही उत्सुक

आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फिरकी गोलंदाजांची उणीव भासण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2021 02:48 AM2021-04-06T02:48:06+5:302021-04-06T02:48:59+5:30

whatsapp join usJoin us
IPL 2021: Renaming Punjab Kings eager to change fortunes | IPL 2021: नाव बदलणारा पंजाब किंग्स भाग्य बदलण्यासही उत्सुक

IPL 2021: नाव बदलणारा पंजाब किंग्स भाग्य बदलण्यासही उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : नव्या नावासह आणि बलाढ्य खेळाडूंच्या सोबतीने आयपीएलच्या १४ व्या पर्वात स्वत:चे भाग्य बदलण्यास उत्सुक असलेला पंजाब किंग्स संघ डेथ ओव्हरमधील गोलंदाजीची चिंता दूर करीत मधली फळी भक्कम करण्यावर भर देणार आहे. पंजाब संघ मागच्या पर्वात सुरुवातीला सहाव्या स्थानावर होता. मात्र, त्यानंतर सलग पाच विजयांसह या संघाने प्ले ऑफच्या जवळपास झेप घेतली होती.

पहिल्या सामन्यात त्यांना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वादग्रस्त ‘शॉर्ट रन’चा फटका बसला होता. हा निर्णय त्यांच्याविरोधात गेला नसता तर हा संघ अव्वल चार संघांत खेळला असता. यादरम्यान वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला अन्य वेगवान गोलंदाजांची साथ लाभली नव्हती. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ग्लेन मॅक्सवेलची बॅटदेखील तळपली नव्हती.

आगामी पर्वात ही चिंता दूर करण्याचा पंजाबने प्रयत्न केला. मुंबईत राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांना १२ एप्रिल रोजी पहिला सामना खेळायचा आहे. या संघाची भक्कम बाजू त्यांची फलंदाजी मानली जाते. कर्णधार लोकेश राहुल याने मागच्या सत्रात सर्वाधिक धावा केल्या. यंदादेखील तो फॉर्ममध्ये आहे. तो आणि मयांक अग्रवाल ही जोडी सलामीला चांगल्या धावा काढतात. ‘युनिव्हर्सल बॉस’ ख्रिस गेल मागच्या वेळी सुरुवातीचे काही सामने खेळू शकला नव्हता. तरीही नंतरच्या सात सामन्यांत त्याने २८८ धावांचे योगदान दिले. यावेळी तो पहिला सामना खेळेल, अशी अपेक्षा आहे. मोठे फटके मारणारा यष्टीरक्षक फलंदाज निकोलस पुरन चौथ्या स्थानावर खेळू शकतो. याशिवाय संघाने डेव्हिड मलान याच्यावर गेल आणि पुरन यांचा पर्याय म्हणून विश्वास बाळगला आहे.

पंजाब किंग्सने आतापर्यंत एकदाही जेतेपद पटकाविलेले नाही. कागदावर हा संघ बलाढ्य वाटत आहे. राहुलचे नेतृत्व आणि कोच अनिल कुंबळे यांचे मार्गदर्शन यंदा संघाला कुठपर्यंत मजल गाठून देईल, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. मागच्या वर्षी २० गडी बाद करणारा शमी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मनगटाच्या दुखापतीमुळे चार महिन्यांनंतर मैदानावर परतला. त्याचा फॉर्म कसा आहे, यावरदेखील फ्रँचायजीची नजर असेल.

पंजाब किंग्स संघ 
 लोकेश राहुल (कर्णधार आणि यष्टिरक्षक ), मयांक अग्रवाल, ख्रिस गेल, मनदीपसिंग, प्रभसिमरनसिंग, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सरफराज खान, दीपक हुड्डा, मुरुगन अश्विन, रवी बिश्नोई, हरप्रीत बराड, मोहम्मद शमी, अर्शदीपसिंग, इशान पोरेल, दर्शन नळकांडे, ख्रिस जॉर्डन, डेव्हि मलान, झाय रिचर्डसन, शाहरुख खान, रिले मेरेडिथ, मोझेस हेन्रिक्स, जलज सक्सेना, उत्कर्षसिंग, फॅबियन ॲलन आणि सौरभ कुमार.

मधल्या फळीवर भिस्त
मॅक्सवेलला रिलीज केल्यानंतर पंजाबने अष्टपैलू मोझेस हेन्रिक्स आणि तामिळनाडूचा फलंदाज शाहरुख खान यांना संघात स्थान दिले. अनुभवी दीपक हुड्डा, तसेच फॅबियन ॲलन हा विदेशी अष्टपैलू खेळाडू मधल्या फळीत खेळून धावसंख्येला आकार देऊ शकतील.

वेगवान मारा सुधारला
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसन आणि रिले मेरेडिथ हे संघात आल्यामुळे वेगवान मारा अधिक भेदक झाला आहे, या दोघांमुळे मोहंमद शमी आणि इंग्लंडचा ख्रिस जॉर्डन यांच्यावरील दडपण कमी होऊ शकेल. 
nउत्कृष्ट फिरकीपटूंचा अभाव मात्र संघाला जड जाऊ शकेल. ऑफ स्पिनर के. गौतम याला संघातून काढल्यानंतर अश्विन मुरुगन आणि रवी बिश्नोई, तसेच अनुभवी जलज सक्सेना यांच्यावरच फिरकी मारा विसंबून असेल. आंतरराष्ट्रीय फिरकी गोलंदाजांची उणीव मात्र संघाला भासणार आहे.

Web Title: IPL 2021: Renaming Punjab Kings eager to change fortunes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.