IPL 2021, Mumbai Indians: आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची सुरुवात होण्याआधीच कोरोनाचं ग्रहण लागलेलं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस खेळाडू कोरोना बाधित होत असल्याच्या बातम्या समोर येत असतानाच मुंबई इंडियन्स संघासाठी दिलासादायक बातमी आली आहे. चेन्नईत सराव करत असलेल्या मुंबई इंडियन्स संघातील सर्व खेळाडूंचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे.
मुंबई इंडियन्स संघाचे टॅलेंट स्काऊट आणि यष्टीरक्षक प्रशिक्षक किरण मोरे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. ते सध्या क्वारंटाइन झाले आहेत. त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या सर्वच खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडूंचे नमुने निगेटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे संघ पुन्हा एकदा सरावासाठी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे.
IPL 2021 : प्रथमच खेळताना 'हे' खेळाडू दम दाखवणार; आयपीएलच्या १४व्या पर्वाची संपूर्ण माहिती एका क्लिकवर
भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआय) आयपीएल २०२१ साठी तयार करण्यात आलेल्या नियमांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. यात संघाशी निगडीत कोणत्याही व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आढळल्यास संपूर्ण संघाची नव्याने कोरोना चाचणी करण्यात येते. याच नियमाचं पालन करत किरण मोरे यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर संघातील सर्व खेळाडूंची पुन्हा एकदा कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यासाठी मंगळवारचं सराव सत्र देखील रद्द करण्यात आलं होतं. आता सर्वांचं रिपोर्ट निगेटीव्ह आल्यामुळे खेळाडूंना पुन्हा एकदा सराव करण्यासाठी मैदानात उतरता येणार आहे.
किरण मोरे कोरोना पॉझिटिव्ह
मुंबई इंडियन्स संघाचे यष्टीरक्षक प्रशिक्षक किरण मोरे यांना कोणतीही लक्षणं नसतानाही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यानंतर मोरे यांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे. मुंबई इंडियन्स संघानं ट्विटरवरुन याबाबतची माहिती दिली आहे. किरण मोरे यांची प्रकृती अतिशय उत्तम असून त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत आणि ते आयसोलेट झाले आहेत, असं मुंबई इंडियन्स संघाकडून सांगण्यात आलं आहे.