Indian cricket team opted for series against Windies | विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची निवड
विंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी आज भारतीय क्रिकेट संघाची निवड

कोलकाता : वेस्ट इंडिजविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेचे यजमानपद भूषविणाऱ्या भारतीय संघाची घोषणा गुरुवारी होणार आहे. या बैठकीत उपकर्णधार रोहित शर्मा याला विश्रांती देण्यावर निर्णय अपेक्षित असून सलामीवीर शिखर धवन याच्या खराब फॉर्मवरही चर्चा होणार आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ सध्या बांगलादेशविरुद्ध दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी सज्ज झाला आहे. शुक्रवार २२ नोव्हेंबरपासून कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर हा सामना रंगेल. त्याआधी एम. एस. के. प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती आगामी विंडीज दौºयासाठी भारतीय संघाची निवड करेल. प्रसाद आणि पूर्व विभागाचे निवडकर्ते गगन खोडा यांनी ४ वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यामुळे गुरुवारची बैठक त्यांची अखेरची बैठक ठरेल. या बैठकीत एकदिवसीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मावर अतिक्रिकेटमुळे येणाºया तणावावर चर्चा होऊ शकते.

नवीन वर्षात भारतीय संघ न्यूझीलंड दौºयावर जाणार आहे. त्यामुळे या मालिकेआधी रोहितला पुरेसा आराम मिळावा यासाठी त्याला विंडीजविरुद्धच्या मालिकेत विश्रांती मिळू शकते. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ पाच टी२०, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामने खेळणार आहे.

याव्यतिरीक्त भारतीय संघाचा दुसरा सलामीवीर शिखर धवन सध्या खराब फॉर्मात आहे. स्थानिक क्रिकेटमध्येही शिखरला लौकिकाला साजेसा खेळ करता आलेला नाही. त्यामुळे या मालिकेसाठी लोकेश राहुलला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. निवड समिती कोणत्या खेळाडूला संघात स्थान देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (वृत्तसंस्था)

हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी आणि भुवनेश्वर कुमार हे अद्याप दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे शिवम दुबे आणि शार्दुल ठाकूर यांचे संघातील स्थान कायम असेल.
फिरकी गोलंदाजीत अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर आणि कृणाल पांड्या हे देखील अपेक्षेनुरूप यशस्वी ठरलेले नाहीत. त्यामुळे युझवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांच्यापैकी कुणी खेळल्यास सुंदर किंवा पांड्या यांना राखीव बाकावर बसावे लागणार आहे.
दीपक चाहर वेगवान माºयाचे नेतृत्व करेल पण खलील अहमद हा महागडा ठरल्याने त्याचे स्थान धोक्यात आले. दोन टी२० मध्ये आठ षटकात त्याने तब्बल ८१ धावा मोजल्या होत्या.

धवनच्या खराब फॉर्मवर चर्चा
भारताचे विंडीजविरुद्ध टी२० सामने मुंबई (६ डिसेंबर),त्रिवेंद्रम(८ डिसेंबर) व हैदराबाद (११ डिसेंबर) येथे होतील. त्यानंतर एकदिवसीय सामने चेन्नई (१५ डिसेंबर), विशाखापट्टनम (१८ डिसेंबर) व कटक येथे (२२ डिसेंबर) होतील. रोहितने यंदा आयपीएलसह ६० सामने खेळले. त्यात २५ एकदिवसीय व ११ टी२० सामने आहेत. कोहलीच्या तुलनेत त्याने ३ एकदिवसीय व ४ टी२० अधिक खेळले असून विराटने दोनवेळा विश्रांती घेतली.

धवन दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडला होता. तेव्हापासून तो फॉर्ममध्ये नाही. कसोटीत मयांक अगरवालचा शनदार फॉर्म व लिस्ट अ सामन्यात ५० हून अधिक सरासरीमुळे त्याच्याकडे तिसरा सलामीवीर म्हणून पाहिले जात आहे. धवनने बांगलादेशविरुद्ध तीन टी२० लढतीत ४१, ३१ व १९ धावा केल्या, तर अगरवालने इंदूर कसोटीत दुहेरी शतक झळकवले. रिषभ पंत याच्या सततच्या अपयशावरही चर्चा होणार आहे.

Web Title: Indian cricket team opted for series against Windies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.