India Women Vs South Africa women T20I : Smriti Mandhana become first player to represent India in 50 consecutive T20 matches  | शाब्बास पोरी... विराट, धोनी यांना जे जमलं नाही ते स्मृती मानधनाने करून दाखवलं

शाब्बास पोरी... विराट, धोनी यांना जे जमलं नाही ते स्मृती मानधनाने करून दाखवलं

सुरत, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, महिला क्रिकेट : मिगनन डू प्रीझ (59)च्या दमदार अर्धशतकानंतरही दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाला पहिल्या ट्वेंटी- 20 सामन्यात यजमान भारताविरुद्ध 11 धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताने दिलेल्या 131 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आफ्रिकेचा डाव 19.5 षटकांत 119 धावांत संपुष्टात आला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत कौर सर्वाधिक 43 धावा केल्या. पण, या सामन्यात महाराष्ट्राच्या स्मृती मानधनानं एक असा पराक्रम केला, जो कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी आदी दिग्गजांनाही करता आलेला नाही.

नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आफ्रिकेने यजमानांना 20 षटकांत 8 बाद 130 धावांत रोखले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने आफ्रिकेची 14व्या षटकात 7 बाद 73 अशी अवस्था केली. मात्र एका बाजूने टिकलेल्या प्रीझने 43 चेंडूत 4 चौकार व 3 षटकारांसह 59 धावांची खेळी करत संघाच्या आशा कायम राखल्या. अखेरच्या षटकात आफ्रिकेला १८ धावांची गरज असताना राधा यादवच्या पहिल्याच चेंडूवर प्रीझने षटकार मारला. मात्र यानंतर दोन चेंडू निर्धाव खेळल्यानंतर राधाने चौथ्या चेंडूवर प्रीझला व पाचव्या चेंडूवर एन. म्लाबाला बाद करुन भारताचा विजय साकारला.  

स्मृतीने 16 चेंडूंत 4 चौकारांच्या मदतीनं 21 धावा केल्या. स्मृतीचा हा 50 वा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना होता. सलग 50 ट्वेंटी-20 सामने खेळणारी स्मृती ही भारताची पहिलीच ( महिला व पुरुष) क्रिकेटपटू ठरली आहे. विराट, रोहित, धोनी यांनाही ट्वेंटी-20 कारकिर्दीत सलग 50 सामने खेळता आले नाही. स्मृतीनं ट्वेंटी-20 कारकिर्दीत आतापर्यंत 59 सामन्यांत 24.88च्या सरासरीनं 1319 धावा केल्या आहेत. 86 धावा ही तिची सर्वोत्तम खेळी आहे. स्मृतीनं पहिला ट्वेंटी-20 सामना 2013 ला बांगलादेशविरुद्ध खेळला होता आणि त्यात तिनं 39 धावा केल्या होत्या.

संक्षिप्त धावफलक
भारत : 20 षटकांत 8 बाद 130 धावा (हरमनप्रीत कौर 43, स्मृती मानधना 21; शबनिम इस्माइल 3/26) विजयी वि. दक्षिण आफ्रिका : 19.5 षटकांत सर्वबाद 119 धावा (मिगनन डू प्रीझ 59; दीप्ती शर्मा 3/8, शिखा पांड्ये 2/18). 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India Women Vs South Africa women T20I : Smriti Mandhana become first player to represent India in 50 consecutive T20 matches 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.