बंगळुरु, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची फटकेबाजीची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. आफ्रिकेनं पहिल्याच षटकासाठी फिरकीपटू बीजॉर्न फॉर्टूइनला पाचारण केले. त्याच्या पहिल्याच चेंडूवर धवनने चौकार खेचला आणि टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या चौकारासह धवनने एक विक्रम नावावर केला. शिवाय रोहित शर्मानेही कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.
ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये धवनने 7000 धावांचा पल्ला ओलांडला. अशी कामगिरी करणारा तो रोहित, कोहली आणि सुरेश रैना यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला आहे.
रोहितनं दोन चौकार खेचून आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त सर्वाधिक धावांचा विक्रम पुन्हा नावावर केला. या सामन्यापूर्वी ट्वेंटी-20 सर्वाधिक धावांचा विक्रम कोहलीच्या ( 2441) नावावर होता , तर 2434 धावांसह रोहित दुसऱ्या स्थानी होता. या विक्रमात न्यूझीलंडचा मार्टिन गुप्तील ( 2283), पाकिस्तानचा शोएब मलिक (2263) आणि न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅकलम ( 2140) अव्वल पाचमध्ये आहेत. रोहितला आजच्या सामन्यात 7 धावा कराव्या लागणार होत्या. रोहितनं दोन चौकार खेचून हा विक्रम पुन्हा नावावर केला.