- अयाझ मेमन, कन्सल्टिंग एडिटर लोकमत
तिसरा टी२० सामना जिंकत दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची मालिका बरोबरीत सोडवली. विशेष म्हणजे हा सामना आफ्रिकेने सहजपणे जिंकला आणि त्यामुळेच भारतासाठी हा धोक्याचा इशारा आहे. नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बंगळुरूचा रेकॉर्ड पाहिला, तर येथे संघ धावांचा पाठलाग करण्यास पसंती देतात. मात्र कोहलीने फलंदाजांची परीक्षा पाहण्यास हा निर्णय घेतला आणि त्यामध्ये भारताचे फलंदाज नापास झाले. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषक टी२० स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने योग्य संघबांधणी होणे गरजेचे आहे.
या मालिकेत युवा रिषभ पंतवर सर्वांच्या नजरा होत्या. पण माझ्या मते एकट्या पंतवर नजर नव्हती, तर त्याच्यासोबत श्रेयस अय्यरवरही तेवढेच लक्ष होते. पंतला मालिकेआधी कर्णधार व प्रशिक्षकांकडून इशाराही मिळाला होता. कारण मधली फळी मजबूत होणे अत्यंत गरजेचे आहे. दरवेळी धवन, रोहित आणि कोहली धावा काढतील असे होत नाही आणि अखेरच्या सामन्यात असेच झाले. त्यामुळे पंत आणि अय्यर यांचा समावेश असलेल्या मधल्या फळीवर मोठी जबाबदारी येते. पंतला अनेकदा बेजबाबदार फटके खेळून माघारी जाताना पाहिले आहे. अय्यरकडे नक्कीच टी२०चा फारसा अनुभव नाही; पण अशा संधी खूप कमी मिळतात आणि त्या साधणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण सध्या स्पर्धा खूप तगडी आहे.
स्पर्धेत एक संघ हरतो, तर दुसरा जिंकतो. द. आफ्रिकेच्या युवा संघाने छाप पाडली. या संघात आता हाशिम आमला, एबी डिव्हिलियर्स आणि डेल स्टेन यासारख्या दिग्गजांचा समावेश नाही. नवा कर्णधार क्विंटन डीकॉक आणि कागिसो रबाडा हे संघाचे आधारस्तंभ बनले. डीकॉकने फलंदाजीत, तर रबाडाने गोलंदाजीत वर्चस्व गाजवले. कसोटी मालिकेआधी आफ्रिकेला हा विजय खूप फायदेशीर ठरेल, हे नक्की.
‘आपटे कायम आठवणीत राहतील’
माजी क्रिकेटपटू माधव आपटे यांच्या निधनाने क्रिकेटविश्वाचे नुकसान झाले. १९५३च्या विंडीज दौºयात जबरदस्त कामगिरी केल्यानंतरही त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटची फारशी संधी मिळाली नाही, यावर अनेक वर्षे वाद झाले. इतक्या प्रतिभाशाली खेळाडूला आंतरराष्ट्रीय सामन्याची संधी मिळाली नाही, हे खूप कमी बघण्यास मिळाले. दखल घेण्याची बाब म्हणजे ४-५ दिवसांतच ते वयाची ८७ वर्षे पूर्ण करणार होते. पण त्यांनी ८०व्या वर्षापर्यंत मुंबईत लीग क्रिकेट खेळले. ते क्रिकेटसाठी जगत होते. त्यांची आठवण कायम येते राहील.