India vs South Africa, 2nd Test : Team India scored 200 points in ICC World Test Championship | India vs South Africa, 2nd Test : टीम इंडियानं कसोटी 'वर्ल्ड कप'मध्ये झळकावलं द्विशतक; जाणून घ्या कसं
India vs South Africa, 2nd Test : टीम इंडियानं कसोटी 'वर्ल्ड कप'मध्ये झळकावलं द्विशतक; जाणून घ्या कसं

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका : भारताच्या पहिल्या डावातील 601 धावांचा पाठलाग करण्यात दक्षिण आफ्रिकेला दोन्ही डावांत अपयश आलं. आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गुंडाळल्यानंतर कर्णधार विराट कोहलीनं पाहुण्यांवर फॉलोऑन लादला. दुसऱ्या डावातही आफ्रिकेच्या फलंदाजांची हाराकिरी सुरूच राहिली आणि भारतानं हा सामना एक डाव व 137 धावांनी जिंकला. या विजयासह भारताने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या विजयासह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत द्विशतक झळकावणारा भारत हा पहिलाच संघ ठरला. 


मयांक अग्रवाल ( 108), विराट कोहली ( 254*), चेतेश्वर पुजारा ( 58), अजिंक्य रहाणे ( 59) आणि रवींद्र जडेजा ( 91) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारताने पहिला डाव 5 बाद 601 धावांवर घोषित केला. त्यानंतर आर अश्विन ( 4/69), उमेश यादव ( 3/37) आणि मोहम्मद शमी ( 2/44) यांच्या गोलंदाजीसमोर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 275 धावांत गडगडला. कर्णधार कोहलीनं चौथ्या दिवशी आफ्रिकेला फॉलोऑन दिला. इशांत शर्मानं पहिल्याच षटकात आफ्रिकेला धक्का दिला. त्यानंतर आर अश्विन आणि उमेश यादव यांनी अनुक्रमे दोन व एक विकेट घेत उपहारापर्यंत आफ्रिकेची अवस्था 4 बाद 74 अशी केली होती. 

लंचनंतरच्या पहिल्याच षटकात रवींद्र जडेजानं विकेट घेत आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. त्यानंतर जडेजान आणखी एक विकेट मिळवून दिली. भारताला सातवे यश मोहम्मद शमीनं मिळवून दिलं. त्यानं एस मुथूसामीला बाद केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील त्याचा तो 300 वा बळी ठरला आहे. शमीनं पहिल्या डावात 2 विकेट घेतल्या होत्या. त्यानं कसोटीत 161, वन डेत 131 आणि ट्वेंटी-20त 8 विकेट घेतल्या आहेत. 


केशव महाराज आणि व्हेर्नोन फिलेंडर यांनी पुन्हा एकदा संयमी खेळ करताना भारताचा विजय लांबवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी आठव्या विकेटसाठी 56 धावांची भागीदारी केली. पण, ही जोडी तुटल्यानंतर भारतानं आफ्रिकेचा डाव 189 डावांत गुंडाळला. उमेश यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी जागतिक अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत 200 गुणांची कमाई केली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतानं 120 गुण कमावले होते आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामने जिंकून भारतानं 80 गुणांची भर टाकली. 


Web Title: India vs South Africa, 2nd Test : Team India scored 200 points in ICC World Test Championship
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.