भारत विरुद्ध बांगलादेश ट्वेंटी-20 मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आली आहे. रोहित शर्माच्या तुफानी 85 धावांच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियानं दुसऱ्या ट्वेंटी-20त सहज विजय मिळवला. बांगलादेशचे 154 धावांचे लक्ष्य भारतानं 15.4 षटकांत 2 विकेट्सच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यात रोहितनं अनेक विक्रमांना गवसणी घातली, परंतु त्याची एक कृती काल दिवसभर चर्चेत राहिली. रोहितनं तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर नाराजी प्रकट करताना चक्क शिवी दिली. त्याचे हे कृत्य कॅमेरात कैद झाले. त्यामुळे त्याच्यावर आता कारवाई होईल का, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. पण, सामन्यानंतर रोहितला जेव्हा याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यानं दिलेलं उत्तर मजेशीर आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला लिटन दास व मोहम्मद नईम यांनी दमदार सुरुवात करून दिली. सहाव्या षटकात रोहितनं चेंडू फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या हाती सोपवला. त्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रिषभनं स्टम्पिंग करताना लिटन दासला माघारी पाठवले. पण, तिसऱ्या पंचांनं रिषभची एक चूक पकडली अन् बांगलादेशच्या फलंदाजाला जीवदान मिळालं. पंतनं चेंडू स्टम्पच्या पुढे पकडून स्टम्पिंग केली आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांनी नो बॉल देत लिटन दासला नाबाद ठरवलं. पण, त्यानंतर पंतनेच टीम इंडियाला पहिले यश मिळवून दिले. पंतनं लिटन दासला धावबाद करून माघारी पाठवले.
13व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर पंतनं सौम्या सरकारला यष्टिचीत केले. पण, तिसऱ्या पंचांनी रिप्ले पाहिला आणि सुरुवातीला नाबाद असा निर्णय दिला. पण, त्यांना ही चूक लक्षात येताच त्यांनी निर्णय मागे घेत सरकारला बाद दिले. पंचांच्या या चुकीवर रोहित भडकला आणि शिव्या दिल्या. हा सर्व प्रकार कॅमेरात कैद झाला...
सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला,''मैदानावर मी खूप भावनिक होतो. परिस्थिती कशीही असो, आपले लक्ष्य पूर्ण करण्याचा माझा निर्धार असतो. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी चतुर गोलंदाजी केली. त्यांच्याकडे बऱ्याच स्थानिक आणि आयपीएल सामन्यांच्या अनुभव आहे. त्या प्रकाराबद्दल विचाराल तर, पुढच्या वेळी कॅमेरा कुठेय हे पाहूनच मी व्यक्त होईन ( उत्तर दिल्यानंतर हसला).''