India vs Australia : मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियासमोर पुनरागमनाचे आव्हान आहे. विराट कोहली पत्नी अनुष्काच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे. जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली आहे. रोहित शर्मा सिडनीत दाखल झाला आहे, परंतु क्वारंटाईन कालावधी पूर्ण होत नसल्यामुळे तो दुसऱ्या कसोटीचा भाग होणार नाही. अशात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाचा कस लागणार आहे. सर्वकाही भारताच्या विरोधात जात आहे असे वाटत असताना ऑस्ट्रेलिया संघालाही मोठा धक्का बसला आहे. बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या कसोटीत ५३ धावांच्या पिछाडीवरून जबरदस्त कमबॅक करताना भारतावर ८ विकेट राखून विजय मिळवला. जोश हेझलवूड ( ५ विकेट्स) आणि पॅट कमिन्स ( ४) यांच्या भेदक माऱ्यासमोर भारताचा दुसरा डाव ३६ धावांत गडगडला. ऑस्ट्रेलियाने ९० धावांचे लक्ष्य सहज पार केले. मालिकेत १-० अशा आघाडीनंतर बॉक्सिंग डे कसोटीतही टीम इंडियाला पराभूत करण्यासाठी कांगारू सज्ज झाले आहेत. पहिल्या सामन्याला मुकलेला डेव्हिड वॉर्नर ( David Warner) दुसऱ्या कसोटीत कमबॅक करणार असल्याची चर्चा होती. पण, वॉर्नरनं दुसऱ्या कसोटीतूनही माघार घेतली आहे. वॉर्नरसह जलदगती गोलंदाज सीन अॅबोट यानेही दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली आहे.  मोहम्मद शमी ६ आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियानं सांगितले की,''वॉर्नर आणि अॅबोट दुखापतीतून सावरत आहेत आणि सिडनी ते संघाच्या बायो सुरक्षित बबलच्या बाहेरच राहतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे बायो सुरक्षित नियम त्यांना संघासोबत सराव करण्याची परवानगी देत नाहीत. वॉर्नर अजूनही पुर्णपणे तंदुरूस्त झालेला नाही. भारताविरुद्धच्या वन डे मालिकेत त्याला दुखापत झाली होती आणि तो आता दुसऱ्या कसोटीतही खेळणार नाही.'' 
वॉर्नरच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलिया पहिला संघच कायम राखण्याची अधिक शक्यता आहे. मॅथ्यू वेड व जो बर्न्स हीच जोडी सलामीला उतरणार आहे. कॅमेरून ग्रीन संघातील स्थान कायम राखेल. 
उभय संघ यातून निवडणार
भारत :  मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे ( कर्णधार), हनुमा विहारी, रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), उमेश यादव, जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, शुबमन गिल, लोकेश राहुल
ऑस्ट्रेलिया : टिम पेन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जो बर्न्स, पॅट कमिन्स, कॅमरुन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेजलवूड, ट्रेविस हेड, मोइजेस हेनरिक्स, मार्नस लाबुशेन, नाथन लियोन, मायकेल नेसेर, जेम्स पॅटिन्सन, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मॅथ्यू वेड.