Mohammed Shami sidelined for 6 weeks, doubtful starter for England Test series opener | मोहम्मद शमी ६ आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार

मोहम्मद शमी ६ आठवडे क्रिकेटपासून दूर, ऑस्ट्रेलियापाठोपाठ इंग्लंडविरुद्धच्या कसोटीलाही मुकणार

भारतीय क्रिकेट संघासाठी अॅडलेड कसोटी ही एका भयानक स्वप्नासारखीच ठरली आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांक धावसंख्या ( ९ बाद ३६) भारताच्या नावावर नोंदवली गेली. याच सामन्यात ११व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला मोहम्मद शमी ( Mohammed Shami) याच्या हातावर पॅट कमिन्सनं टाकलेला चेंडू जोरात आदळला अन् त्याला रिटायर्ड हर्ट होऊन माघारी जावे लागले. त्यामुळे ९ बाद ३६ धावांवर भारताला खेळ थांबवावा लागला आणि ऑस्ट्रेलियासमोर ९० धावांचे माफक लक्ष्य राहिले. ते त्यांनी दोन विकेट्सच्या मोबदल्यात पार करून चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मोहम्मद शमीची ती दुखापत टीम इंडियासाठी धक्कादायक ठरली आहे. 

शमीला दुखापतीमुळे उर्वरित कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे. आधीच विराट कोहली ( Virat Kohli) माघारी परतला असल्यानं टीम इंडिया अडचणीत आहे, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी विराटनं सुट्टी मागितली होती आणि ती BCCIनं मान्य केली आहे. विराट मंगळवारी मायदेशी परतला अन् शमी बुधवारी भारतात परतणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शमी सहा आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीत इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यालाही तो मुकण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ इंग्लंडचा पाहुणचार करणार आहे. इंग्लंड भारत दौऱ्यावर चार कसोटी, पाच ट्वेंटी-20 आणि तीन वन डे सामन्यांची मालिका खेळणा आहे. BCCIच्या सूत्रांनी PTIला सांगितले की,''शमीला पुन्हा तंदुरुस्त होण्यासाठी सहा आठवडे लागतील आणि त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याचे खेळणे अनिश्चित आहे. हातावरील प्लास्टर काढल्यानंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होईल.'' 

अॅडलेड कसोटीत शमीला एकही विकेट घेता आली नाही. त्याच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराज किंवा नवदीप सैनी यांचे नाव चर्चेत आहेत. दुसरी कसोटी २६ डिसेंबरपासून सुरू होणार आहे आणि विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे संघाचे नेतृत्व करणार आहे. 

भारत विरुद्ध इंग्लंड मालिकेचे वेळापत्रक 
कसोटी मालिका
पहिली ५ ते ९ फेब्रुवारी - चेन्नई
दुसरी चेन्नई १३ ते १७ फेब्रुवारी- चेन्नई
तिसरी २४ ते २८ फेब्रुवारी- अहमदाबाद
चौथी ४ ते ८ मार्च -अहमदाबाद
टी-२० (सर्व सामने अहमदाबाद)
 १) १२ मार्च पहिला टी-२०
२) १४ मार्च दुसरा टी-२०
३) १६ मार्च तिसरा टी-२०
४) १८ मार्च चौथा टी-२०
५) २० मार्च पाचवा टी-२०
वन-डे मालिका (सर्व सामने पुणे येथे)
१) २३ मार्च पहिला वन-डे
२) २६ मार्च दुसरा वन-डे
३) २८ मार्च तिसरा वन-डे

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mohammed Shami sidelined for 6 weeks, doubtful starter for England Test series opener

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.