India Australia Match: Challenge to save the series; Is it right to learn from mistakes? | India Australia Match: मालिका वाचविण्याचे आव्हान; चुकांपासून बोध घेत साधणार का बरोबरी?  

India Australia Match: मालिका वाचविण्याचे आव्हान; चुकांपासून बोध घेत साधणार का बरोबरी?  

सिडनी : सलामीच्या सामन्यात लय मिळविण्यासाठी संघर्ष करणाऱ्या भारतीय संघापुढे आज रविवारी येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन डेत ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याचे आव्हान असेल. त्यासाठी चुकांपासून बोध घेत विजयासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावी लागेल. पहिली लढत भारताने ६६ धावांनी गमावली. ऑस्ट्रेलियाने भारताच्या कमकुवतपणाचा जो लाभ घेतला तो पाहता कोच रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांचे डोळे उघडले असावेत. हार्दिक पांड्याच्या ७६ चेंडूतील ९० आणि सलामीवीर शिखर धवनच्या ७६ धावा हीच भारतासाठी दिलासादायी बाब ठरली.

पांड्याने टी-२० विश्वचषकाआधी गोलंदाजी करू शकणार नसल्याची स्वत: कबुली दिली आहे. अशावेळी कोहलीकडे फलंदाजी करू न शकणारे गोलंदाज शिल्लक राहिले, शिवाय आघाडीच्या फळीतील फलंदाज गोलंदाजी करू शकत नाहीत. सामन्यानंतर फलंदाजीबाबत चर्चा झाल्याची माहिती कोहलीने दिली असून आम्ही सकारात्मक  विचाराने खेळण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले होते. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार ॲरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हे जबर फॉर्ममध्ये आहेत. त्यांच्यापुढे बुमराहसह कोणताही गोलंदाज प्रभावी ठरताना जाणवला नाही.  काही फलंदाजांनी बेजबाबदार फटके मारून स्वत:चा बळी दिला होता. श्रेयस अय्यर आणि मयांक यांना जबाबदारी स्वीकारावीच लागेल. कर्णधार कोहली याच्यावरदेखील मीडिया आणि स्थानिक चाहत्यांचे बारकाईने लक्ष आहे. त्याला मोठी खेळी करावीच लागेल. ऑस्ट्रेलियाकडून मार्क्‌स स्टोईनिस जखमी झाल्याने खेळू शकणार नाही. युजवेंद्र चहल आणि नवदीप सैनी अनफिट नसतील तर भारतीय गोलंदाजीत बदल होण्याची सुतराम शक्यता नाही. चहल- सैनी यांनी २० षटकात १७२ धावा मोजल्या. जखमेमुळे चहल मैदानाबाहेर गेला तर सैनीच्या कमरेत दुखणे उमळले आहे.  कव्हर करण्यासाठी टी. नटराजनला संघात ठेवण्यात आले आहे. दोघे न खेळल्यास सैनी ऐवजी शार्दुल ठाकूर आणि चहलऐवजी कुलदीप यादवला संधी मिळेल.

उभय संघ यातून निवडणार
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, शुभमान गिल, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर.

ऑस्ट्रेलिया : ॲरोन फिंच (कर्णधार), डेव्हिड वाॅर्नर, स्टीव स्मिथ, मार्नस लाबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोईनिस, ॲलेक्स केरी, पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, एडम जाम्पा, जोश हेजलवुड, सीन एबोट, एश्टोन एगर, कैमरन ग्रीन, मोइजेस हेनरिक्स, एंड्रयू टाये, डेनियल सैम्स, मॅथ्यू वेड. 

विराट कोहली सिडनी मैदानावर कधीही यशस्वी ठरलेला नाही. त्याने येथे सहावेळा फलंदाजी केली. त्यात दोनदा प्रत्येकी २१-२१ धावा केल्या. एकूण ५७ धावा काढणाऱ्या विराटची येथे ११.४० अशी सरासरी राहिली आहे. 

‘आपण नेहमी मोठे लक्ष्य डोळ्यापुढे ठेवायला हवे. आम्ही टी-२० विश्वचषक आणि महत्वाच्या स्पर्धांवर लक्ष ठेवून आहोत. या मोठ्या स्पर्धांमध्ये माझी गोलंदाजी महत्त्वाची ठरणार आहे.  मला अधिक वेगवान गोलंदाजी करायची आहे. त्यासाठी मी सध्याच्या घडीला काही गोष्टींवर भर देत आहे. पण योग्य वेळ आल्यावर मी नक्कीच गोलंदाजी करताना तुम्हाला दिसेन.”    - हार्दिक पांड्या

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: India Australia Match: Challenge to save the series; Is it right to learn from mistakes?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.