IND vs SA ODI Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका सुरू आहे. अनेक स्टार खेळाडूंची तंदुरुस्ती टीम इंडियासाठी चिंतेचा विषय ठरताना दिसत आहे. कर्णधार शुभमन गिलच्या दुखापतीमुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. ज्यामुळे २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत नेतृत्व करण्याची शक्यता आहे. केवळ कसोटी मालिकेसाठीच नाही तर त्यानंतर होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठीही तंदुरुस्ती आणि वर्कलोडचे प्रश्न कायम आहेत. कर्णधार गिल आणि उपकर्णधार श्रेयस अय्यर या मालिकेत त्यांच्या सहभागाबद्दल अनिश्चित आहेत, परंतु इतर दोन स्टार खेळाडू देखील तीन एकदिवसीय सामन्यांना मुकू शकतात.
गिल खेळण्याची शक्यता, पण 'हा' खेळाडू मुकणार!
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील एकदिवसीय मालिका ३० नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथे दुसऱ्या कसोटी सामन्याच्या समाप्तीनंतर सुरू होईल. मालिकेतील पहिला सामना रांची येथे खेळला जाईल. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा अद्याप झालेली नाही. यासाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा यांची निवड जवळपास निश्चित आहे. परंतु कर्णधार गिल आणि अय्यर यांच्या तंदुरुस्तीवर प्रश्नचिन्ह आहे. गिल या मालिकेसाठी तंदुरुस्त असू शकतो, परंतु अय्यरला बरे होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची दाट शक्यता आहे.
टी२० वर लक्ष केंद्रित, म्हणून बुमराहला विश्रांती
या दिग्गज खेळाडूंव्यतिरिक्त, या मालिकेतून आणखी दोन खेळाडूंना वगळले जाऊ शकते. पहिले नाव जसप्रीत बुमराह आहे. वृत्तसंस्था पीटीआयच्या वृत्तानुसार, स्टार वेगवान गोलंदाज बुमराहला या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते. पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने हा विचार केला जाऊ शकतो. बुमराहला शक्य तितक्या जास्त टी२० सामन्यांमध्ये भाग घेता यावा यासाठी त्याला वनडे मालिकेतून विश्रांती दिली जाऊ शकते.