मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंग यांच्यासह अनेक दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंनी या सामन्यासाठी उपस्थिती दर्शवली होती. या वेळी सचिन, हरभजन यांच्यासह अनिल कुंबळे, व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी पहिल्या दिवस-रात्र सामन्याच्या निमित्ताने इडन गार्डन्सवरील अनेक आठवणींना उजाळा दिला.
सचिन तेंडुलकर व अनिल कुंबळेसह अनेक दिग्गजांनी शुक्रवारी इडन गार्डन्सच्या गतस्मृतींना उजाळा दिला. सर्वांनी बीसीसीआय प्रमुख व संघसहकारी सौरव गांगुली यांचे सर्वांना एकत्र आणल्याबद्दल आभारही मानले. कुंबळे म्हणाला, ‘आम्ही खेळायचो तेव्हा असे एकत्र बसून चर्चा करण्यास वेळ मिळाला नाही. हा विशेष दिवस आहे. ऐतिहासिक सामन्याचे यासाठी निमित्त आहे.’
लक्ष्मण-द्रविड यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध २००१ मध्ये ३७६ धावांची भागीदारी केल्यानंतर हरभजन व सचिनने शानदार गोलंदाजी केली. भज्जीने हॅट्ट्रिकसह १३ गडी बाद केले होते. सचिन म्हणाला, ‘त्या ‘हॅट्ट्रिक’ने सामन्याचे चित्र बदलून टाकले होते. आम्ही तो सामना ज्या प्रकारे जिंकला तेथून भारतीय क्रिकेटचा नवा प्रवास सुरू झाला. लक्ष्मण-द्रविड यांच्या भागीदारीने ड्रेसिंग रूममधील आत्मविश्वास उंचावला.’
इडनवरील शुक्रवारचे वातावरण पाहताच हरभजनला २००१च्या कसोटीची आठवण झाली. तो म्हणाला, ‘येथील वातावरण पाहून मी १५ वर्षे आधीच्या काळात गेलो. त्यासाठी गांगुलीचे आभार. मी शंभर कर्णधारांच्या नेतृत्वात खेळलो तरीही सौरव हाच माझा नेहमी कर्णधार राहील.’