दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुक्रवारी कोरोना व्हायरस संकटानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी आपले दिशानिर्देश जाहीर केले. त्यात मुख्य चिकित्सा अधिकाऱ्याची (सीएमओ) नियुक्ती आणि १४ दिवस विलगीकरणामध्ये सराव शिबिर आयोजित करण्याच्या शिफारशीचा समावेश आहे.
आयसीसीने जगभरात क्रिकेट पुन्हा सुरू करण्यासाठी दिशानिर्देश जाहीर केले आहेत आणि त्याचसोबत उच्च सुरक्षा प्रोटोकॉल पाळण्यावरही लक्ष देण्यात आले आहे.
आयसीसीने म्हटले की,‘मुख्य चिकित्सा अधिकारी किंवा जैव सुरक्षा अधिकाºयाच्या नियुक्तीचा विचार करायला पाहिजे. हा अधिकारी सरकारी दिशानिर्देश व सराव आणि स्पर्धा सुरू करण्यासाठी जैव सुरक्षा योजना लागू करण्यासाठी जबाबदार राहील. सामन्यापूर्वी विलगीकरणात सराव शिबिराचे आयोजन, स्वास्थ्य, खेळाडूंच्या शरीराच्या तापमानाची नियमित चाचणी आणि कोविड-१९ चाचणीची गरज आहे का, याबाबत निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवासापूर्वी किमान १४ दिवसापूर्वी संघ कोविड-१९ मुक्त आहे, याची खातरजमा करायला हवी. क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने सराव व स्पर्धेदरम्यान योग्य चाचणी योजना तयार करण्याची शिफारस केली आहे. (वृत्तसंस्था)