भारतीय अंडर-१९ संघाने आशिया कप २०२५ मध्ये आपल्या मोहिमेची सुरुवात दिमाखदार शैलीत केली. सलामीच्या लढतीत टीम इंडियाने यूएई अंडर-१९ संघाचा २३४ धावांच्या मोठ्या फरकाने धुव्वा उडवला. या विजयाचा शिल्पकार ठरला तो भारताचा सलामीवीर फलंदाज वैभव सूर्यवंशी, ज्याने केवळ १७१ धावांची वादळी खेळी करून क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यानंतर वैभव सूर्यवंशीने स्लेजिंगबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
वैभवची स्फोटक खेळी
युएईविरुद्धच्या या सामन्यात वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीच्या जोरावर मैदानात चौकार-षटकारांची आतषबाजी केली. त्याने ठोकलेल्या १७१ धावांमध्ये तब्बल १४ षटकार आणि नऊ चौकारांचा समावेश होता. त्याच्या या अविश्वसनीय कामगिरीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
स्लेजिंगवर 'बिहारी' ॲटिट्यूड
या धडाकेबाज खेळीदरम्यान वैभवला यूएईच्या खेळाडूंकडून स्लेजिंगचाही सामना करावा लागला. सामन्यानंतर जेव्हा त्याला स्लेजिंगबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याचे उत्तर ऐकून सर्वांनी दाद दिली. वैभव म्हणाला, "सर, मी बिहारचा आहे. त्यामुळे माझ्या पाठीमागे कोणी काहीही बोलले तरी मला काही फरक पडत नाही. विकेटकीपरचे काम बोलत राहणे असते, पण मी पूर्णपणे माझ्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित केले होते." वैभवने अगदी शांतपणे, पण आत्मविश्वासाने दिलेले हे उत्तर सध्या क्रिकेट वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
वैभवसाठी २०२५ ठरले 'सुवर्ण' वर्ष
वैभव सूर्यवंशीसाठी २०२५ हे वर्ष खूपच उल्लेखनीय ठरले आहे. याच वर्षी त्याला आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. तसेच इमर्जिंग आशिया कपमध्येही टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले.
पाकिस्तानविरुद्ध 'महामुकाबला'
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने गट 'अ' मध्ये दोन महत्त्वाचे गुण मिळवून चांगली सुरुवात केली आहे. आता सर्वांचे लक्ष १४ डिसेंबर रोजी होणाऱ्या पाकिस्तान अंडर-१९ संघाविरुद्धच्या पुढील सामन्याकडे लागले आहे. या स्पर्धेत पाकिस्ताननेही आपल्या पहिल्या सामन्यात मलेशियाचा २९७ धावांनी पराभव करत जोरदार तयारी दर्शवली आहे.