फिनिक्स भरारी; छोट्याश्या बेटावरील संघ खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप; देणार दिग्गजांना टक्कर

स्वप्नांना केवळ बळ असून चालत नाही, ते पूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीही लागते. रविवारी एका छोट्याश्या बेटावरील क्रिकेट संघानं त्याची प्रचिती दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 07:19 PM2019-10-27T19:19:14+5:302019-10-27T19:20:22+5:30

whatsapp join usJoin us
Great Achievement: Papua New Guinea qualify for their first Men’s T20 World Cup in 2020  | फिनिक्स भरारी; छोट्याश्या बेटावरील संघ खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप; देणार दिग्गजांना टक्कर

फिनिक्स भरारी; छोट्याश्या बेटावरील संघ खेळणार ट्वेंटी-20 वर्ल्ड कप; देणार दिग्गजांना टक्कर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

स्वप्नांना केवळ बळ असून चालत नाही, ते पूर्ण करण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीही लागते. रविवारी एका छोट्याश्या बेटावरील क्रिकेट संघानं त्याची प्रचिती दिली. प्रबळ इच्छाशक्ती आणि पक्क्या निर्धाराच्या या संघानं थेट 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे तिकीट पक्कं केलं. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या या स्पर्धेत ते आता भल्याभल्या दिग्गजांनाही टक्कर देण्यासाठी सज्ज झाले आहेत. इनमिन 80 लाख लोकसंख्या, बेटावरील बहुतांश भाग हा आदीवासी पाड्याचा, रग्बी हा त्यांचा पसंतीतला खेळ, त्यामुळे क्रिकेटशी दुरान्वये संबंध नसलेल्या या संघानं फिनिक्स भरारी घेत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) वर्ल्ड कप स्पर्धेत प्रवेश केला आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल हा कोणता संघ? 

पापुआ न्यू गिनी, असं या संघाचे नाव आहे. ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात A गटात केनियावर थरारक विजय मिळवून 2020च्या मुख्य फेरीत प्रवेश केला आहे. इम्मान्युएल रिंगेरा यानं गोलंदाजीत कमाल दाखवताना 18 धावांत पापुआ न्यू गिनीच्या 4 फलंदाजांना माघारी पाठवले. त्याला लुकास ओलुच व कॉलिन ओबुया यांनी प्रत्येकी दोन विकेट घेत उत्तम साथ दिली. त्यांच्या अचुक माऱ्यासमोर पापुआ न्यू गिनीचा संघ 19.3 षटकांत 118 धावांत माघारी परतला. नोर्मन वनुआने अखेरच्या षटकांत संमजसपणे खेळ केला. त्याच्या 48 चेंडूवरील 3 चौकार व 2 षटकारांच्या मदतीनं 54 धावा करत पापुआ न्यू गिनीला समाधानकारक पल्ला गाठून दिला.

केनियाला हे माफक आव्हानही पार करता आले नाही. त्यांचा संपूर्ण संघ 73 धावांत गारद झाला. नोसैना पोकाना ( 3/21), अस्साद वाला ( 3/7), वनुआ ( 2/19) आणि डॅमिएन रावू ( 2/14) यांनी केनियाला धक्के दिले. केनियाला 18.4 षटकांत 73 धावा करता आल्या. या विजयासह पापुआ न्यू गिनीनं A गटात सर्वाधिक 10 गुणांची कमाई केली आणि अव्वल स्थान पटकावले. या कामगिरीसह पापुआ न्यू गिनीनं ऑस्ट्रेलियात पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश निश्चित केला.

जर्सी संघ आयर्लंडला पावला
B गटात जर्सी संघाने अखेरच्या साळखी सामन्यात ओमानचा पराभव करत आयर्लंडचा वर्ल्ड कप स्पर्धेतील मुख्य फेरीचा मार्ग मोकळा केला. जर्सीच्या 7 बाद 141 धावांचा पाठलाग करताना ओमानला 9 बाद 127 धावा करता आल्या. त्यामुळे B गटात ओमान आणि आयर्लंड यांच्यात समसमान 8 गुण झाले, परंतु सर्वोत्तम नेट रन रेटच्या जोरावर आयर्लंडने मुख्य फेरीत थेट प्रवेश मिळवला. आता ओमानला प्ले ऑफ मार्गे मुख्य फेरीत प्रवेश करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

Web Title: Great Achievement: Papua New Guinea qualify for their first Men’s T20 World Cup in 2020 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.