Cyclone Tauktae: तौक्ते वादळानं सोमवारी मुंबईला हादरवून सोडले. मुंबईच्या सखल भागात पाणी साचले, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणची झाडं पडली. देशाच्या आर्थिक राजधानीत या वादळानं ९० किमी प्रती तासाच्या वेगानं घडक दिली. या वादळाचा वानखेडे स्टेडियमलाही फटका बसला. या वादळामुळे वानखेडे स्टेडियमच्या नॉर्थ स्टँडच्या साईड स्क्रीनचं नुकसान झालं आहे.
टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री हेही वादळाची ताकद पाहून चक्रावून गेले. तौक्ते वादळ मुंबईकरांची झोप उडवत होते तेव्हा शास्त्रींनी सोशल मीडियावरून वादळाचे वर्णन केले. ते म्हणाले,''वादळ हे वादळच असते. तो आताही सुरू आहे आणि हे वादळ आणखी नुकसान करू नये यासाठी फिंगर क्रॉस केले आहे.''
तौक्ते वादळानं आता मुंबईकडून गुजरातच्या दिशेनं कूच केली आहे. त्यानं वानखेडे स्टेडियमवरील १६ फुट उंचीच्या साईडस्क्रीनला नुकसान पोहोचवले. ही साईडस्क्रीन वादळी वाऱ्यामुळे पडली आहे. २०११मध्येही ही साईडस्क्रीन पडली होती.
गुजरातच्या दिशेनं कूच करणाऱ्या वादळाचा फटका अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमलाही बसू शकतो. आता या वादळाची गती १५० ते १७५ किमी प्रती तास आहे.