मलेशिया : भारतात 2023मध्ये होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या पात्रता फेरीत कॅनडाच्या संघाने गुरुवारी विक्रमी कामगिरी केली. वर्ल्ड कप चॅलेंज लीगच्या अ गटातील सामन्यात कॅनडानं 50 षटकांत 7 बाद 408 धावा चोपून काढताना मलेशियाच्या गोलंदाजांना हतबल केले. वन डे क्रिकेटमधील 16वी सर्वोत्तम धावसंख्या आहे. त्यांनी 2019च्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने ( 9 बाद 408 वि. न्यूझीलंड ) 2015मध्ये नोंदवलेल्या विक्रमाशी बरोबरी केली. पण, विकेट्सच्या बाबतीत कॅनडा जग्गजेत्यांवर भारी पडले.

प्रथम फलंदाजी करताना रॉड्रीगो थॉमस आणि कर्णधार नवनीत धलीवाल यांनी कॅनडाला 140 धावांची सलामी करून दिली. या दोघांनी सुरुवातीपासून मलेशियाच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. थॉमस 67 चेंडूंत 5 चौकार व 4 षटकारांसह 62 धावा करून माघारी परतला. त्याला अन्वर रहमानने बाद केले. त्यानंतर धलीवाल व नितीश कुमार यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागादीर केली. धलीवाल 94 चेंडूंत 8 चौकार व 13 षटकार खेचून 140 धावा करून बाद झाला.  कुमारने 50 चेंडूंत 5 चौकार व 2 षटकारांसह 60 धावा केल्या. त्यानंतर कॅनडाच्या तळाचे फलंदाज अपयशी ठरताना दिसले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या रवींदरपाल सिंगने 46 चेंडूंत 5 चौकार व 9 षटकारांसह 94 धावांची वादळी खेळी करून कॅनडाची धावसंख्या चारशेपार नेली. 

अशी रंगणार चुरस
 2023 चा वर्ल्ड कप भारतात होणार आहे आणि वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच संपूर्ण स्पर्धा भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी यजमान भारतानं स्थान पक्के केले आहे आणि आयसीसी क्रमवारीनुसार भारत सोडून सुपर लीगमधील अव्वल सात संघ थेट पात्र ठरणार आहेत. पण, उर्वरित दोन स्थानांसाठी जवळपास 17 संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. 

आयसीसीनं सोमवारी क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 चे वेळापत्रक जाहीर केले. या लीग 2 मध्ये नामिबिया, नेपाळ, ओमान, पापुआ न्यू गिनी, स्कॉटलंड, संयुक्त अरब अमिराती आणि अमेरिका या सात संघांमध्ये 126 वन डे आंतरराष्ट्रीय सामने होणार आहेत. या देशांमध्ये एकूण 21 तिरंगी मालिका होणार आहेत. ऑगस्ट 2019 ते जानेवारी 2022 या कालावधीत प्रत्येक संघाला  36 वन डे सामने खेळणार आहेत. 

या लीगमधील अव्वल तीन संघ 2022 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप पात्रता फेरीसाठी पात्र ठरतील. तर तळातील चार संघ प्ले ऑफ स्पर्धेत खेळतील आणि ते A आणि B चॅलेंज लीगच्या विजेत्या संघांशी भिडतील. प्ले ऑफमधून दोन संघ पात्रता फेरीत प्रवेश करतील आणि त्यानंतर उर्वरीत दोन स्थानांसाठी 10 संघात चुरस होईल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: CWC Challenge League Group A : Navneet Dhaliwal's brilliant 140 and Ravinderpal Singh's blistering 94 powered Canada to 408/7 against Malaysia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.