Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

एका अहवालानुसार आयपीएल रद्द झाले तर बीसीसीआयला किमान १० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 03:11 AM2020-03-15T03:11:23+5:302020-03-15T03:12:57+5:30

whatsapp join usJoin us
Coronavirus: BCCI hits Rs 10,000 crore? There is no concrete decision on the IPL event | Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

Coronavirus : बीसीसीआयला १० हजार कोटींचा फटका? आयोजनाबाबत ठोस निर्णय नाही

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे (इंडियन प्रीमियर लीग) १३ वे पर्व सध्या १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. मात्र, आयपीएल रद्द करावी लागलेच तर बीसीसीआयला सुमारे दहा हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागणार आहे.
पूर्वघोषित कार्यक्रमानुसार, आयपीएल २९ मार्च ते २४ मे या कालावधीत होणार होती. ही स्पर्धा ५६ दिवस रंगणार होती. जर बीसीसीआयने स्पर्धेला १५ एप्रिलपासून प्रारंभ केला, तर स्पर्धा ४० दिवस चालेल. कारण अन्य आंतरराष्ट्रीय संघांचा आयसीसी भविष्य दौरा कार्यक्रम (एफटीपी) बघता, ही स्पर्धा अधिक काळ लांबविणे शक्य होणार नाही.

जर सामने प्रेक्षकांविना खेळविण्यात आले आणि खेळाडूंच्या सार्वजनिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली तर फ्रॅन्चायझीला प्रायोजन रकमेचे नुकसान सोसावे लागेल. स्टार स्पोर्टस्ने प्रसारण अधिकारासाठी पाच वर्षांचा १६,३४७ कोटी रुपयांचा (प्रत्येक वर्षी ५,५०० कोटी रुपये) करार केला आहे. जर आयपीएलचा कालावधी कमी झाला तर ते बीसीसीआयसोबत याबाबत नव्याने चर्चा करतील.

१० हजार कोटी रुपयांचे नुकसान
एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रकाशित अहवालानुसार ग्रुप एमचे बिझनेस हेड विनीत कर्णिक यांच्या मते, ‘आयपीएलमध्ये प्रतिभावान खेळाडूंच्या पथकात ३५ टक्के खेळाडू दुसऱ्या देशातील असतात. नव्या व्हिजा नियमानुसार त्यांच्या प्रवेशावर बंदी घातली जाऊ शकते. सर्व सुरक्षा व आचरणाबाबत चिंता महत्त्वाची आहे. कारण यामध्ये अनेक हितधारकांचा समावेश आहे.’ एका अहवालानुसार आयपीएल रद्द झाले तर बीसीसीआयला किमान १० हजार कोटी रुपयांचे नुकसान सोसावे लागेल. आयपीएलमधील ८ संघात अंदाजे ६०० लोक कायमस्वरुपी किंवा कंत्राटी पद्धतीवर काम करतात. त्यामुळे आयपीएल रद्द झाले तर अनेकांच्या नोकरीवर गंडांतर येण्याची शक्यता आहे.

आयपीएल झाले तर ते छोटे असेल - गांगुली



मुंबई : इंडियन प्रिमियर लिग कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. जर नंतर आयपीएलचे आयोजन करण्यात आले तर ते छोटे असेल, असे स्पष्टीकरण बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुलीने दिले आहे.
आयपीएलचे सत्र २९ मार्चपासून सुुरू होणार होते. मात्र, १५ एप्रिलपर्यंत ते स्थगित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गांगुली म्हणाले, ‘आयपीएल जर १५ एप्रिलनंतर घेण्यात आली तर ते छोटेच करावे लागले. मात्र, ते किती लहान असेल हे मी आताच सांगू शकत नाही.
आयपीएलच्या संचालन बैठकीनंतर गांगुलीने सांगितले, ‘आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. लोकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असणार आहे. सरकारच्या सूचनेनुसार आम्ही सर्व स्थानिक स्पर्धा रद्द केलेल्या आहेत. ’दुसरा काही पर्याय आहे का, यावर गांगुली म्हणाले, ‘सध्या याबाबत काहीही सांगू श्कत नाही. एक आठवड्यानंतर स्थिती आणखी स्पष्ट होईल, अशी अपेक्षा आहे.’

आम्ही सर्व फ्रॅँचायजी मालकांशी चर्चा केली आहे. सध्याची स्थिती व पुढे काय होऊ शकते यावर आम्ही चर्चा केली. आम्ही आयपीएलचे आयोजन करु इच्छित आहोत. मात्र लोकांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य असणार आहे. आम्ही प्रत्येक आठवड्याला परिस्थितीचा आढावा घेणार आहोत. - सौरभ गांगुली

विदेशात आयोजनाबाबत चर्चा झाली नाही
मुंबई : बीसीसीआय आणि आयपीएलच्या आठ फ्रेन्चायझी संघांच्या मालकांदरम्यान शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये आयपीएलच्या (इंडियन प्रीमिअर लीग) सामन्यांच्या संख्येत कपात करण्यावर चर्चा झाली तर किंग्स इलेव्हन पंजाबचे मालक नेस वाडिया म्हणाले की, कोरोना महामारीचा विचार करता ही टी-२० लीग स्पर्धा केव्हा सुरू होईल, याची मला कल्पना नाही.
बीसीसीआयने सरकारने प्रवासाबाबत केलेले नवे नियम व तीन राज्यांनी यजमानपद भूषविण्यास नकार दिल्यानंतर शुक्रवारी आयपीएल २९ मार्चपासून १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
बोर्डाच्या सूत्रानी सांगितले की, बैठकीमध्ये विविध पर्यायांवर चर्चा झाली. बीसीसीआयच्या सूत्राने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, ‘संघ मालक व बीसीसीआय यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीमध्ये सहा ते सात पर्यायांवर चर्चा झाली. त्यात आयपीएल सामन्यांच्या संख्येत कपात करण्याचाही समावेश होता.’

आयपीएलपेक्षा जीव वाचणे महत्त्वाचे - गावसकर



मुंबई : माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे समर्थन केले. बीसीसीआयने कोरोना व्हायरस महामारीमुळे २९ मार्चपासून प्रारंभ होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गावस्कर यांनी या निर्णयाचे समर्थन केले. ते म्हणाले, ‘हा निर्णय घेणे आवश्यक होते. सर्वांचे स्वास्थ्य याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. बीसीसीआयने जो निर्णय घेतला तो केवळ भारतीयांच्याच हिताचा नाही. बीसीसीआयने हा निर्णय घेताना क्रिकेटसोबत जुळलेल्या सर्वांच्या हिताचा विचार करून घेतला आहे. आयपीएलमध्ये दुसºया देशातील खेळाडूंव्यतिरिक्त अम्पायर, टेक्निशियन व कॅमेरामन येतात.’
गावस्कर पुढे म्हणाले, ‘आयपीएलदरम्यान स्टेडियममध्ये ३० ते ४० हजार प्रेक्षकांची गर्दी असते. याव्यतिरिक्त स्टेडियमच्या बाहेर व हॉटेल्स्च्या लॉबीमध्ये चाहत्यांची गर्दी बघायला मिळते. लोकांच्या गर्दीमुळे कोरोना व्हायरसच्या संक्रमणाची शक्यता नाकारता येत नाही.’

रिकाम्या स्टेडियममध्ये आयोजित व्हावे सामने
कुणी संगीतकार, कलाकार किंवा अभिनेता यापैकी कुणीही असो दर्शक नसलेल्या स्थळावर कामगिरी करेल तर कसे होईल? अशा
स्थितीत स्पर्धा रद्द करणे चांगले राहील आणि बीसीसीआयने ते करून दाखविले आहे. लोक नेहमी म्हणतात की, बीसीसीआय केवळ पैशाचा विचार करते. पण, बीसीसीआयने पूर्ण भारताचा विचार केला आहे, हे यावरून सिद्ध होते.

स्पर्धा केव्हा सुरू होणार माहीत नाही - वाडिया
आयपीएल मालकांची बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह यांच्यादरम्यान झालेल्या बैठकीनंतर बोलताना वाडिया म्हणाले, ‘स्पर्धा केव्हा सुरू होईल, हे आम्ही किंवा कुणीच सध्यातरी सांगण्याच्या स्थितीत नाही. आम्ही दोन-तीन आठवड्यानंतर परिस्थितीची माहिती घेऊ. तोपर्यंत कोरोना रुग्णांची संख्या कमी होईल, अशी आशा आहे.’ ते म्हणाले, ‘बीसीसीआय, आयपीएल व स्टार(स्पोर्ट््स) अधिकृत प्रसारक यांनी स्पष्ट केले की, आम्ही आर्थिक नुकसानीबाबत विचार करीत नाही.’ व्यक्तीचे जीवन महत्त्वाचे असून पैसा त्यानंतर असतो, यावर बैठकीमध्ये सर्वांचे एकमत होते. आम्ही सरकारच्या दिशानिर्देशांचे पालन करू. या महिन्याच्या अखेरपर्यंत कुठला निर्णय होईल, असे मला वाटत नाही. आम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे.’

योग्यवेळी निर्णय घेऊ - जिंदल
दिल्ली कॅपिटल्सचे मालक पार्थ जिंदल यांनी पर्यायांवर चर्चा करण्याला अधिक महत्त्व न देण्याचा प्रयत्न करताना म्हटले की, अन्य पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आणखी एक बैठक होईल.’ जिंदल पुढे म्हणाले, ‘परिस्थिती सुधारल्यानंतर बीसीसीआय सर्व पर्यायांवर चर्चा करण्यासाठी आणखी एका बैठकीचे आयोजन करेल. आजची बैठक केवळ परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी होती. आम्ही योग्यवेळी निर्णय घेऊ.’ जास्तीत जास्त वेळा एका दिवशी दोन सामन्यांचे आयोजन होईल का, याबाबत बोलताना जिंदल म्हणाले, आम्ही कुठल्याही बाबीवर चर्चा केली नाही. आम्ही परिस्थितीचा आढावा घेऊ. लोकांचे जीवन सर्वांत महत्त्वाचे आहे. स्थिती नियंत्रणात आल्यानंतर सर्व पर्यायांवर चर्चा होऊ शकते.’

Web Title: Coronavirus: BCCI hits Rs 10,000 crore? There is no concrete decision on the IPL event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.