पाकिस्तानचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज मोहम्मद रिझवान याच्यासाठी सध्याचा काळ अत्यंत कठीण जात असल्याचे दिसून येत आहे. बिग बॅश लीग २०२५-२६ मध्ये मेलबर्न रेनेगेड्सकडून खेळणाऱ्या रिझवानला त्याच्या संथ फलंदाजीमुळे मैदानातच अपमानास्पद वागणुकीचा सामना करावा लागला. सिडनी थंडर विरुद्धच्या सामन्यात अत्यंत धीम्या गतीने धावा केल्यामुळे कर्णधाराने रिझवानला चक्क रिटायर्ड आउट होण्याचा इशारा दिला आणि त्याला अनिच्छेने मैदान सोडावे लागले.
सोमवारी झालेल्या या सामन्यात रिझवान चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. मात्र, सिडनी थंडरच्या गोलंदाजांसमोर त्याला धावा काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. रिझवानने २३ चेंडूत केवळ २६ धावा केल्या, ज्यात २ चौकार आणि १ षटकाराचा समावेश होता. त्याचा स्ट्राइक रेट अवघा ११३.०४ होता. संघाची धावगती मंदावल्याचे पाहून कर्णधाराने रिझवानला रिटायर्ड आउट होण्याचा इशारा दिला. त्यानंतर रिझवान नाराज झाला आणि मान खाली टेकवून पॅव्हेलियनमध्ये परतला.
बिग बॅश लीग सुरू होण्यापूर्वी पाकिस्तानी मीडियाने या स्पर्धेचा मोठा गाजावाजा केला होता. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि रिझवान यांसारख्या खेळाडूंमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती, पण ते पूर्णपणे अपयशी ठरले. या स्पर्धेत मोहम्मद रिझवानने ८ डावात २०.८७ च्या सरासरीने १६७ धावा केल्या. तर, बाबर आझमने सिडनी सिक्सर्सकडून खेळताना ८ सामन्यात केवळ १५४ धावा केल्या आणि हरिस रौफ हा धावा रोखण्यात अपयशी ठरला आहे.
टी-२० विश्वचषकातील स्थान धोक्यात?
रिझवानच्या या खराब कामगिरीमुळे त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संथ स्ट्राइक रेटमुळे त्याला यापूर्वीच पाकिस्तानच्या टी-२० संघातून वगळण्यात आले. २०२६ च्या टी-२० विश्वचषक संघात त्याला स्थान मिळण्याची शक्यता आता धुसर दिसत आहे. बीबीएलमधील या कामगिरीनंतर, मेलबर्न रेनेगेड्स किंवा इतर कोणताही संघ रिझवानला पुढील हंगामासाठी कायम ठेवण्याची शक्यता कमी असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे.