Australia strengthened by Labushen's century | लाबुशेनच्या शतकाने ऑस्ट्रेलिया भक्कम

लाबुशेनच्या शतकाने ऑस्ट्रेलिया भक्कम

ब्रिस्बेन : फिटनेसच्या समस्यांनी त्रस्त असलेल्या भारतीय संघातील अनुभवहीन गोलंदाजांनी प्रभावी मारा केल्यानंतरही मार्नस लाबुशेन याने 
शतक ठोकून चौथ्या आणि निर्णायक कसोटीच्या पहिल्या दिवशी शुक्रवारी ऑस्ट्रेलियाला ५ बाद २७४ अशी आश्वासक वाटचाल करून दिली. दरम्यान, 
प्रमुख जखमी खेळाडूंच्या अनुपस्थितीत खेळत असलेल्या भारताला आज आणखी एक धक्का बसला. 

स्नायू दुखावल्यामुळे वेगवान गोलंदाज नवदीप सैनी याने मैदान सोडले. त्याच्या जखमेचे स्कॅन करण्यात आले. सुरुवातीचे दोन फलंदाज १७ धावात गमावल्यानंतर लाबुशेनच्या १०८ धावांच्या बळावर यजमान संघाने मुसंडी मारली. खेळ संपला त्यावेळी कर्णधार टिम पेन ३८ आणि कॅमरून ग्रीन २८ धावा काढून नाबाद होते. सहाव्या गड्यासाठी दोघांनी आतापर्यंत ६१ धावांची भागीदारी केली. अखेरच्या सत्रात भारताला आणखी एका गोलंदाजाची उणीव भासली. अखेरच्या सत्रात मॅथ्यू वेड (८७ चेंडूत ४५ धावा ) आणि लाबुशेन यांना नटराजनने बाद केले. लाबुशेनने २०४ चेंडूत ९ चौकारांसह १०८ धावांचे योगदान दिले. कसोटीत पदार्पण कणारा दुसरा गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर याने स्टीव्ह स्मिथला (३६)बाद केले. डेव्हिड वॉर्नर एक धावा काढून बाद झाला. भारताकडून शार्दुल ठाकूर यानेदेखील भेदक मारा केला.

रहाणे, पुजारा यांनी सोडले झेल
कर्णधार अजिंक्य रहाणे आणि अनुभवी चेतेश्वर पुजारा या दोघांनी लाबुशेनचे सोपे झेल सोडले. लाबुशेन ३७ धावांवर असताना सैनीच्या चेंडूवर रहाणेकडून सोपा झेल सुटला. ४८ धावांवर असताना चेतेश्वर पुजाराने लाबुशेनचा झेल सोडला. याचा फायदा घेत त्याने शतकी खेळी केली.

नवदीप सैनीला झाली दुखापत
आपले आठवे षटक टाकत असताना वेगवान गोलंदाज नवदीप सैनी जायबंदी झाला. स्नायू दुखावल्यामुळे ३६ व्या षटकातील पाचव्या चेंडूनंतर अर्ध्यातच मैदान सौडून सैनी तंबूत परतला. त्यानंतर उर्वरित एक चेंडू रोहित शर्माने टाकला. या मालिकेत जवळपास १३ भारतीय खेळाडूंना दुखापत झाली आहे.

मोठी खेळी करू न शकल्यामुळे निराश- लाबुशेन
ब्रिस्बेन : चौथ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे करिअरमध्ये पाचव्या शतकाची नोंद करणारा ऑस्ट्रेलियाचा युवा फलंदाज मार्नस लाबुशेन याने २०४ चेंडूंत १०८ धावांची खेळी केली खरी, मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आल्यामुळे निराशा व्यक्त केली. ऑनलाइन पत्रकार परिषदेत लाबुशेन म्हणाला, ‘शतकानंतर मोठ्या धावा काढू न शकल्यामुळे निराश झालो आहे. माझ्या आणखी धावा संघाची स्थिती बळकट करण्यास उपयुक्त ठरल्या असत्या. कसोटीत शतक कुठल्या संघाविरुद्ध कुठल्या स्थितीत ठोकले याला महत्त्व नसते. शतकी खेळी करण्यास महत्त्व असते. मोठ्या धावा काढू शकलो नाही याची खंत आहे.’ सुरुवातीला धावा नाकारणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या शिस्तबद्ध माऱ्याचे लाबुशेनने कौतुक केले. तो पुढे म्हणाला, ‘भारताची गोलंदाजी शिस्तबद्ध आहे. नेहमी रणनीतीनुसार मारा करणाऱ्या भारतीय गोलंदाजांनी आजही उत्कृष्ट गोलंदाजी केली. आमची योजना मात्र गोलंदाजांना थकवून धावा काढण्याची संधी शोधण्याची होती. उत्कृष्ट संघाविरुद्ध खेळताना गोलंदाजी कोण करतो याला फारसे महत्त्व नसतेच. भारताने सामन्यात अतिरिक्त गोलंदाज खेळविण्याचा निर्णय घेतला होता. आम्ही प्रत्येक गोलंदाजाला धाव कशी घ्यायची या चिंतेत होतो. दिवसअखेर चांगली मजल गाठू शकलो याचे समाधान वाटते.’

धावफलक
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : डेव्हिड वॉर्नर झे. शर्मा गो. सिराज १, मार्कस हॅरिस झे. सुंदर गो. ठाकूर ५, मार्नस लाबुशेन झे. पंत गो. नटराजन १०८, स्टीव स्मिथ झे. शर्मा गो. सुंदर ३६, मॅथ्यू वेड झे. ठाकूर गो. नटराजन ४५, कॅमरुन ग्रीन नाबाद २८, टीम पेन नाबाद ३८ अवांतर : १३, एकूण धावा : ८७ षटकांत ५ बाद २७४ धावा. गडी बाद क्रम : १/४, २/१७, ३/८७, ४/२००, ५२१३. गोलंदाजी : सिराज ९-८-५१-१, नटराजन २०-२-६३-२, ठाकूर १८-५-६७-१, सैनी ७.५-२-२१-०, सुंदर २२-४-६३-१, रोहित ०.१-०-१-०.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Australia strengthened by Labushen's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.