पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये सुरु झालेल्या युद्धाच्या तोफा थंडावल्या असल्या तरी दोन्ही देशांत वाढलेली दरी काही कमी होणार नाहीय. यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार, प्रवास बंद असणार आहे. अशातच बीसीसीआयने मोठा निर्णय घेतल्याचे समजते आहे. येत्या जूनमध्ये होणार असलेल्या आशिया कपमध्ये भारतीय संघ भाग घेणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेला कथितरित्या याबाबत कळविले आहे. येत्या जूनमध्ये श्रीलंकेत होत असलेल्या महिला इमर्जिंग टीम्स आशिया कप आणि पुरुषांचा आशिया कप २०२५ मधून भारतीय संघाचे नाव मागे घेत असल्याचे बीसीसीआयने एसीसीला कळविले आहे. महत्वाचे म्हणजे पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत. यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का देण्यात आला आहे.
दी इंडियन एक्स्प्रेसने याबाबतचे वृत्त दिले आहे. हा निर्णय भारत-पाकिस्तानमध्ये वाढलेल्या तनावाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. ''भारतीय संघ एसीसीने आयोजित केलेल्या आणि पाकिस्तानी मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील स्पर्धेत खेळू शकत नाही. ही देशाची भावना आहे. आम्ही आगामी महिला इमर्जिंग टीम्स आशिया कपमधून माघार घेतल्याबद्दल एसीसीला तोंडी कळवले आहे आणि त्यांच्या भविष्यातील स्पर्धांमधील आमचा सहभागही थांबवण्यात आला आहे, असे बीसीसीआयच्या सुत्राने म्हटले आहे.
महत्वाचे म्हणजे आशिया कप भारताने आयोजित केला होता. पुढील वर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषकामुळे यंदाची ही स्पर्धा २०-२० स्वरुपात होणार होती. २०२३ नंतर ही स्पर्धा होत होती. या स्पर्धेचे बहुतांश प्रायोजक हे भारतीय आहेत. यामुळे ते देखील या स्पर्धेतून माघार घेण्याची शक्यता आहे. असे झाले तर ही स्पर्धाच रद्द होऊ शकते.