Marnus Labuschagne Wicket Controversy, Ashes 2025: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील चौथी अॅशेस कसोटी अवघ्या दोन दिवसांत संपली. इंग्लंडने ४ गडी राखून सामना जिंकला. मेलबर्नच्या या कसोटीत दुसऱ्या दिवशी मार्नस लाबुशेनची विकेट अधिक वादग्रस्त ठरली. या निर्णयामुळे मालिकेतील पंच आणि तंत्रज्ञानाबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. जो रूटने जोश टंगच्या चेंडूवर स्लिपमध्ये लाबुशेनला ८ धावांवर बाद केले. इंग्लंडच्या खेळाडूंनी आनंद साजरा केला, परंतु ऑस्ट्रेलियन फलंदाज लाबुशेन मैदानातच थांबला. त्यानंतर मैदानावरील पंचांनी तिसऱ्या पंचांना विचारले. त्यांनीही लाबुशेनला बाद ठरवल्याने वाद अधिक तीव्र झाला.
वाद का रंगला?
जोश टंगने लाबुशेनला बाद करण्याची ही दुसरी वेळ होती आणि त्याची पद्धतही समानच होती. ऑफ स्टंपबाहेर टाकलेल्या चेंडूवर लाबुशेन शॉट खेळायला गेला, पण चेंडू थोडासा स्विंग झाला आणि पहिल्या स्लिपमध्ये जो रूटने झेल घेतला. रूटने पुढल्या बाजूला उडी घेत झेल टिपला. पण रिप्लेमध्ये चेंडू झेलला की नाही हे कळत नव्हते. अनेकांना वाटले की, चेंडू झेल घेण्याआधी जमिनीवर पडला असावा. पण तिसऱ्या पंचांनीही त्याला बाद ठरवले. त्यामुळे प्रेक्षक, समालोचक आणि खेळाडूंमध्ये मतभेद निर्माण झाले.
लाबुशेनची तीव्र नाराजी
लाबुशेन या निर्णयाने स्पष्टपणे निराश झाला. स्क्रीनवर 'आउट' दिल्याचे दिसताच, त्याने रागाने हवेत हातवारे केले आणि निर्णय अमान्य असल्याने डोकं हलवत पॅव्हेलियनमध्ये परतला. ऑस्ट्रेलिया बिकट परिस्थितीत असताना त्याच्यावर डाव सावरण्याची जबाबदारी होती. त्याच वेळी असे घडल्याने तो अधिकच नाराज आणि संतापलेला दिसला.