ओव्हल, अॅशेस 2019 : यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपुष्टात आला. ब्रॉड व जॅक लिच यांनी चार बळी मिळवले. पण, या सामन्यात असा एक प्रसंग घडला की त्याची चर्चा सोशल मीडियावर फार काळ रंगली.
या सामन्यात इंग्लंडच्या ख्रिस वोक्सने कसोटी क्रिकेटमधील पहिला नो बॉल टाकला. मैदानावरील पंचांच्या हे लक्षात आले नाही, परंतु तिसऱ्या पंचांनी त्यांच्या त्वरित लक्षात आणून दिले. विशेष म्हणजे या चेंडूवर वोक्सला विकेट मिळाली होती. या सामन्याच्या चौथ्या दिवशी वोक्सने हा नो बॉल टाकला. कसोटीत प्रथमच त्याचा पाच लाइनच्या पुढे पडला. 31व्या षटकातील तो दुसरा चेंडू होता. त्यावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल मार्श बाद झाला होता. इंग्लंडच्या खेळाडूंनी जल्लोष करायला सुरुवात केली, परंतु मैदानावरील पंचांनी मार्शला थांबवले.
मैदानावरील पंचांनी वोक्सच्या त्या चेंडूबाबत तिसऱ्या पंचांना विचारणा केली. तेव्हा तो नो बॉल असल्याचे निष्पन्न झाले. वोक्सनं 5200 चेंडूनंतर म्हणजेच जवळपास 867 षटकानंतर कसोटीत प्रथमच नो बॉल टाकला आणि त्याचा मोठा फटका त्याला सोसावा लागला.