अॅशेस 2019 : क्रिकेटमध्ये गोलंदाजांकडे बरीच अस्त्रे असतात, त्यापैकी एक मोठं अस्त्र म्हणजे बाऊन्सर. बऱ्याचदा वेगवान गोलंदाज बाऊन्सर टाकून फलंदाजाला घाबरवण्याचा किंवा त्याचे मानसीकरीत्या खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करतो. काही वेळा बाऊन्सरमुळे फलंदाज एवढा गंभीर जखमी होतो की, त्यानंतर त्याचे नेमके काय होणार, हे कुणालाही ठाऊक नसते. अशीच एक गोष्ट घडली ती अॅशेस मालिकेत.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पदार्पण करण्याची संधी देण्यात आली. ऑस्ट्रेलियाचा फॉर्मात असलेल्या स्टीव्हन स्मिथला रोखण्यासाठी आर्चरला संघात स्थान देण्यात आले होते. या सामन्यात आर्चरला स्मिथला बाद करता आले नाही. पण आर्चरने एका बाऊन्सद्वारे स्मिथला जायबंदी केले आणि त्यामुळेच स्मिथला दुसऱ्या डावात फलंदाजी करता आली नाही. स्मिथ हा इंग्लिश गोलंदाज जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर एक उसळता चेंडू मानेवर लागून जखमी झाला. त्यावेळी स्मिथ 80 धावांवर खेळत होता. मात्र या वेदनेतून सावरत स्मिथने पुढे फलंदाजी केली. पण दुसऱ्या दिवशी उठल्यावर स्मिथला त्रास होऊ लागला. त्यामुळे या सामन्यात पुढे खेळणे त्याच्यासाठी अशक्य झाले.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने यावेळी जेव्हा स्मिथला चेंडू लागला तेव्हाचा अनुभव विशद केला. पॉन्टिंगला यावेळी 2005 साली झालेल्या अॅशेस मालिकेत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्ह हार्मिसनने पॉन्टिंगसह मॅथ्यू हेडन आणि जस्टीन लँगर यांना जायबंदी केले होते.

पॉन्टिंग म्हणाला की, " स्टीव्हन स्मिथच्या बाबतीत आमच्यासाठी हो क्षण वाईट होता. आर्चरची गोलंदाजी पाहून काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. जेव्हा 2005 साली मला चेंडू लागला होता, तेव्हा इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉनने आपल्या खेळाडूंना माझ्या जवळ न जाण्यास सांगितले होते. त्यामुळे मला जेव्हा चेंडू लागला तेव्हा माझी विचारपूस करायला एकही इंग्लंडचा खेळाडू माझ्या जवळ आला नव्हता."

स्मिथ जायबंदी झाल्यावर पाचव्या दिवशी सकाळी सामनाधिकारी रंजन मदुगले यांची भेट घेऊन त्याच्या जागी मार्न्स लाबुशेन याचा संघात समावेश करण्याचे पत्र ऑस्ट्रेलियाने दिले. त्यानंतर उर्वरित लढतीसाठी लाबुशेनचा संघात समावेश करण्यात आला. दरम्यान, फलंदाजीस आल्यावर लाबुशेन यालाही जोफ्रा आर्चरच्या उसळत्या चेंडूचा प्रसाद मिळाला. मात्र लाबुशेनने धैर्याने खेळ करत मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उठवला आणि 59 धावांची सुरेख खेळी करत सामना अनिर्णितावस्थेकडे झुकवण्यात मोलाचा वाटा उचलला.