वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजाच्या प्रश्नानं चांगलच भेडसावलं होतं. त्याचा फटकाही टीम इंडियाला बसला होता. वर्ल्ड कप स्पर्धा संपून सहा महिने झाले आणि अजूनही या क्रमांकासाठी सक्षम पर्याय सापडलेला नाही. पण, भारताच्या कसोटी संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे यानं वन डे क्रिकेट संघात कमबॅक करण्याचा विश्वास व्यक्त करताना चौथ्या क्रमांकावर दावा पेश केला आहे. फेब्रुवारी 2018पासून रहाणे वन डे क्रिकेटपासून दूर आहे. पण, आता कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करून टीम इंडियाच्या वन डे संघात परतण्याचा निर्धार त्यानं बोलून दाखवला आहे.

ऑगस्ट 2016मध्ये रहाणेनं अखेरच्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 सामना खेळला होता. त्यानंतर गतवर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वन डे सामना खेळला होता. तो म्हणाला,''कसोटी क्रिकेटमध्ये मला सातत्यपूर्ण खेळ करायचा आहे. धावा करत राहिला, तर मी वन डे संघातही कमबॅक करेन. हे सर्व स्वतःवरील विश्वासावर अवलंबून आहे. वर्तमानात जगणं, मला मदतशीर ठरणारं आहे. त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये मी संघासाठी धावा करत राहिलो, तर वन डे संघातही कमबॅक करेन.''

इडन गार्डनवर होणाऱ्या डे नाइट कसोटीबाबत रहाणे म्हणाला,''राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आम्ही गुलाबी चेंडूवर सराव केला. दिवस आणि रात्र अशा दोन सत्रांत आम्ही सराव केला. हा अनुभव अविस्मरणीय होता. आम्ही या संदर्भात राहुल द्रविड यांच्याशीही चर्चा केली.''

भारताचा कसोटी संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत. 

14 ते 18 नोव्हेंबर - पहिली कसोटी, इंदूर
22 ते 26 नोव्हेंबर - दुसरी कसोटी, कोलकाता.

Web Title: Ajinkya Rahane says he is confident of making a comeback in Team India ODI side with consistency in Tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.