Aiden Markram Record With Century : जवळपास दोन महिने आयपीएलमध्ये मग्न असलेला एडन मार्करम क्रिकेटच्या पंढरीत लाल चेंडूवर तल्लीन होऊन बॅटिंग करणार का? हा एक मोठा प्रश्नच होता. पहिल्यांदा गोलंदाजीची वेळ आल्यावर पार्ट टाइम जॉब उत्तम बजावताना त्याने गोलंदाजी करत सेट झालेल्या स्टीव्ह स्मिथची विकेट घेत संघाला मोठा दिलासा दिला. पण फलंदाजीला आल्यावर पहिल्याच डावात त्याच्या पदरी भोपळा पडला. सलामीवीर शून्यावर तंबूत परतल्यावर २१२ धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ अवघ्या १३८ धावांवर आटोपला होता. ही दक्षिण आफ्रिकेसाठी धोक्याची घंटा होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
जिथं प्रमुख गोलंदाज दमले तिथं मार्करम कामी आला
दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचा फ्लॉप शो भरून काढण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावात पुन्हा जोर लावला. दुसऱ्या डावात रबाडा अन् लुंगी एनिग्डीनं ऑस्ट्रेलियन फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले. पण जिथं रबाडा अन् लुंगी अन् यान्सेनचा जोर कमी पडला तिथं पुन्हा मार्करम धावून आला. ज्या मिचेल स्टार्क अन् जोश हेजलवूड जोडीनं दक्षिण आफ्रिकेच्या प्रमुख गोलंदाजांना दमवलं ती जोडी मार्करमनं फोडली. दोन्ही डावात १-१ विकेट घेऊन गोलंदाजीत छाप सोडल्यावर २८२ धावांचा पाठलाग करताना पहिल्या डावातील कसर भरून काढण्यासाठी तो मैदानात उतरला. अन् तग धरून बॅटिंग करत त्याने शतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
२१ व्या शतकातील असा पहिला 'शतकवीर' ठरला मार्करम
पहिल्या डावात झीरो ठरल्यावर शतकी खेळीसह मार्करम वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील फायनलचा हिरो ठरलाच. पण शतकी खेळीसह त्याने खास विक्रमालाही गवसणी घातली. त्याच्या रुपात २९ वर्षानंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध एखाद्या फलंदाजाने आयसीसीच्या फायनलमध्ये शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. २१ व्या शतकात अशी कामगिरी करणारा तो पहिलाच शतकवीर ठरलाय. याआधी १९९६ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत श्रीलंकन दिग्गज अरविंद डिसिल्वा याने आयसीसी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावले होते.
फक्त तीन फलंदाजांनीच ICC च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ठोकलंय शतक
आयसीसीच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचा बोलबाला राहिला आहे. वनडे, टी-२० आणि कसोटी टेस्ट चॅम्पियनशिप सर्व स्पर्धा या संघाने जिंकल्या आहेत. आयसीसीच्या फायनलमध्ये भले भले फलंदाज ऑस्ट्रेलियासमोर नांगी टाकताना दिसून आले आहे. क्रिकेटच्या आतापर्यंतच्या इतिहासात आयसीसीच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध फक्त तिघांनी शतक ठोकले आहे. कॅरेबियन दिग्गज सर क्लाइव्ह लॉयड हे ICC च्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक झळकावणारे पहिले फलंदाज आहेत. १९७५ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांनी हा पराक्रम केला होता. त्यानंतर १९९६ च्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये अरविंद डिसिल्वा या श्रीलंकन दिग्गजाने ही कामगिरी करून दाखवली होती. WTC च्या फायनल लढतीत शतक झळकावत एडन मार्करम या दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसलाय.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत शतक ठोकणारा तिसरा फलंदाज
२०१९-२१ पासून आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धा खेळवण्यात येते. या स्पर्धेतील पहिली फायनल भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झाली होती. पहिल्या वहिल्या हंगामातील फायनलमध्ये दोन्ही संघातील एकाही बॅटरला शतकी खेळी करता आली नव्हती. २०२१-२३ च्या गत हंगामातील फायनलमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल झाली. ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाला पराभूत करत फायनल बाजी मारली होती. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यातील स्टीव्ह स्मिथ १२१ (२६८) आणि ट्रॅविस हेड १६३ (१७४) या दोघांनी फायलमध्ये शतके झळकावली होती. तिसऱ्या हंगामात एडन मार्करम हा आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत शतक झळकवणारा तिसरा फलंदाज ठरला आहे.
Web Title: Aiden Markram Becomes The First Batter This Century To Score A Hundred Against Australia In An ICC Final See Record
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.