In the absence of Virat Kohli, India's batting will be weak | 'विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत होईल'

'विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारताची फलंदाजी कमकुवत होईल'

ठळक मुद्देसिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार असल्यामुळे, भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत होईल आणि त्यामुळे संघ निवडीबाबत द्विधा मन:स्थिती निर्माण होईल. पण मालिकेचा निकाल मात्र संघ निवडीवरच

सिडनी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतणार असल्यामुळे, भारतीय संघाची फलंदाजी कमकुवत होईल आणि त्यामुळे संघ  निवडीबाबत द्विधा मन:स्थिती निर्माण होईल. पण मालिकेचा निकाल मात्र संघ निवडीवरच अवलंबून राहील, असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपेल यांनी व्यक्त केले. कोहली ॲडिलेडमध्ये १७ ते २१ डिसेंबर या कालावधीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर पहिल्या बाळाच्या जन्मासाठी मायदेशी परतणार आहे. ७७ वर्षीय चॅपेल यांना वाटते की, भारतीय फलंदाजांना आपले कौशल्य दाखविण्याची ही चांगली संधी आहे. 
चॅपेल म्हणाले,‘कोहली परतल्यानंतर  भारतीय फलंदाजी कमकुवत होईल आणि त्याचसोबत त्यांच्या प्रतिभावान खेळाडूंपैकी एकाला स्वत:ची प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल.’

ते पुढे म्हणाले,‘आतापर्यंत रंगतदार भासत असलेल्या या मालिकेला आता नवे वळण प्राप्त झाले असून, त्यात संघनिवड हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. निवड समिती कुणाला संधी देते, यावर बरेच काही अवलंबून आहे.’ योग्य खेळाडूच्या निवडीला महत्त्व देताना चॅपेल यांनी ऑस्ट्रेलियाने सलामी जोडीसाठी डेव्हिड वॉर्नरसोबत बर्न्सऐवजी विल पुकोवस्कीला प्राधान्य दिले आहे. त्यांच्या मते, ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांचे मत वेगळे आहे. ते फॉर्मात नसलेल्या बर्न्सचे समर्थन करीत आहेत. चॅपेल यांच्या मते, निवड ही सध्याच्या फॉर्मच्या आधारावर व्हायला हवी. 

चॅपेल पुढे म्हणाले,‘डेव्हिड वॉर्नरसह सलामीचा जोडीदार म्हणून बर्न्स व युवा स्टार विल पुकोवस्की यांच्यादरम्यान ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकांच्या मनात साशंकता होती. बर्न्सने गेल्या मोसमात ३२ च्या सरासरीने दोन अर्धशतकांसह २५६ धावा केल्या होत्या. कसोटीपटू म्हणून त्याची ही कामगिरी निराशाजनक होती.’चॅपेल म्हणाले,‘पुकोवस्कीने शिल्ड पातळीवरील स्पर्धेत सहा शतके ठोकली होती. त्यात तीन द्विशतकी खेळींचा समावेश होता. त्यापैकी दोन द्विशतके यंदाच्या मोसमातील आहेत. ’चॅपेल यांना वाटते की, कोविड-१९ महामारीदरम्यान तयारीबाबत चर्चा केली तर त्यात भारत पुढे आहे. ते म्हणाले,‘यंदाच्या मोसमात महामारीमुळे ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट कार्यक्रम ढासळला. त्यामुळे भारताला गेल्या दौऱ्यात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या मोहिमेचा लाभ होईल.’

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In the absence of Virat Kohli, India's batting will be weak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.