अंडर-१९ आशिया चषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून १९१ धावांच्या मोठ्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिलेल्या भारतीय संघाची कामगिरी अंतिम सामन्यात तिन्ही आघाड्यांवर अत्यंत सुमार ठरली. पाकिस्तानने दिलेल्या ३४८ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ अवघ्या १५६ धावांत गारद झाला.
भारताच्या पराभवाची ५ कारणे
१) नाणेफेक जिंकून चुकीचा निर्णय
दुबईच्या खेळपट्टीवर नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय कर्णधाराने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो पूर्णपणे अंगलट आला. पाकिस्तानने या संधीचा फायदा घेत फलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ३४७ धावांचा डोंगर उभा केला. तज्ज्ञांच्या मते, भारताने प्रथम फलंदाजी केली असती तर सामन्याचे चित्र वेगळे असते.
२) खराब गोलंदाजी
जेतेपदाच्या सामन्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे हतबल दिसले. वापरलेल्या ६ पैकी ५ गोलंदाजांचा इकॉनॉमी रेट ६ च्या वर होता. दीपेशने १० षटकांत ८३, तर कनिष्क चौहानने ७२ धावा दिल्या. केवळ खिलन पटेलने १० षटकांत ४४ धावा देत थोडा प्रतिकार केला.
३) टॉप ऑर्डरची निराशाजनक कामगिरी
३४८ धावांचा पाठलाग करताना भारताने पहिल्याच षटकात २१ धावा कुटून चांगली सुरुवात केली. मात्र, त्यानंतर १० व्या षटकापर्यंत भारताने आपले ५ प्रमुख फलंदाज गमावले. कर्णधार आयुष म्हात्रे (२ धावा) आणि विहान मल्होत्रा (७ धावा) स्वस्तात बाद झाल्याने भारतीय डाव सावरू शकला नाही.
ज्या खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा होत्या, तेच अंतिम सामन्यात अपयशी ठरले. वैभव सूर्यवंशीने २६ धावा केल्या, पण प्रत्येक चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. स्पर्धेत द्विशतक झळकावणारा यष्टीरक्षक अभिज्ञान कुंडू देखील केवळ १२ धावांवर माघारी परतला.
५) समीर मिन्हासचे वादळी शतक
सलामीवीर समीर मिन्हास पाकिस्तानच्या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने अवघ्या ११३ चेंडूत १७२ धावांची ऐतिहासिक खेळी केली. विशेष म्हणजे, भारताचा संपूर्ण संघ मिळून १५६ धावा करू शकला. तर एकट्या समीरने १७२ धावा कुटल्या. त्याच्या या डावात १७ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.