चौथी कसोटी : भारतापुढे विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य, सिराजच्या ‘पंच’पुढे ऑस्ट्रेलिया सर्व बाद २९४

भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णीत राखण्यात यश मिळविले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 03:09 AM2021-01-19T03:09:25+5:302021-01-19T06:58:56+5:30

whatsapp join usJoin us
4th Test: India wants 328 run for victory, Australia all out on 294 | चौथी कसोटी : भारतापुढे विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य, सिराजच्या ‘पंच’पुढे ऑस्ट्रेलिया सर्व बाद २९४

चौथी कसोटी : भारतापुढे विजयासाठी 328 धावांचे लक्ष्य, सिराजच्या ‘पंच’पुढे ऑस्ट्रेलिया सर्व बाद २९४

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ब्रिस्बेन : मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे ब्रिस्बेनच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने २९४ धावांपर्यंत मजल मारली. पाचव्या आणि अखेरच्या दिवशी ऐतिहासिक विजयासाठी भारतीय संघाला ३२८ धावांची गरज असेल. सोमवारी चौथ्या दिवसाचा उर्वरित खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. खेळ थांबविण्यापूर्वी दुसऱ्या डावात भारताने बिनबाद चार धावा केल्या आहेत. रोहित शर्माने चार धावा केल्या असून शुभमन गिलने खाते उघडले नव्हते.

भारतीय संघ अद्याप ३२४ धावांनी पिछाडीवर आहे. बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ बरोबरीत आहे. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. तिसरा कसोटी सामना भारताने अनिर्णीत राखण्यात यश मिळविले. त्यामुळे पाचव्या दिवशी विजय मिळवून चषकावर नाव कोरण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. अनुभवी गोलंदाजांच्या अनुपस्थितीत सिराजने १९.५ षटकात ७३ धावात पाच गडी बाद केले. शार्दुलने ६१ धावात चार फलंदाजांना माघारी धाडले.

चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने आक्रमक फलंदाजी करत वेगवान धावा काढल्या. डेव्हिड वॉर्नर (६ चौकारांसह ४५ धावा)आणि मार्कस हॅरिस (३८) यांनी तुफानी फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक ५५ धावा काढल्या. लाबुशेन (२५), कॅमरून ग्रीन (३७) आणि कर्णधार पेन (२७) यांनीही झटपट धावा केल्या.

शार्दुलचाही विक्रम
एका कसोटी सामन्यात ६० किंवा त्यापेक्षा अधिक धावा, ७ किंवा त्यापेक्षा अधिक बळी आणि दोन किंवा त्यापेक्षा जास्त झेल टिपणारा शार्दुल ठाकूर हा एकमेव भारतीय खेळाडू ठरला. कसोटी क्रिकेटमध्ये कोणत्याही भारतीयाला हा पराक्रम करता आलेला नाही.

पाचवा गोलंदाज
ब्रिस्बेन मैदानावर इरापल्ली प्रसन्ना यांनी १९६८ मध्ये पाच गडी बाद केले होते. १९७७ मध्ये मदनलाल आणि बिशनसिंग बेदी यांनी तर २००३ ला झहीर खान याचे पाच गडी बाद केले. २०२१ ला हा मान मिळविणारा मोहम्मद सिराज भारताचा पाचवा गोलंदाज बनला.

पावसाची शक्यता
गाबा मैदानावर आतापर्यंत चौथ्या डावात २५० पेक्षा जास्त धावांचे आव्हान कोणत्याही संघाला एकदादेखील पार करता आले नाही. येथे चौथ्या डावात १९५१ मध्ये २३६ धावांचे लक्ष्य गाठून विजय मिळविल्याचा विक्रम वेस्ट इंडिज संघाच्या नावावर आहे. मागच्या शंभर वर्षात या मैदानावर ऑस्ट्रेलियाचा संघ आतापर्यंत एकदाही पराभूत झालेला नाही. या मैदानावरील हा रेकॉर्ड भारतीय संघ मोडणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. भारतासाठी हे लक्ष्य कठीण तर आहेच शिवाय मंगळवारी पावसाच्या व्यत्ययाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

अजिंक्यने सिराजला दिला मॅच बॉल -
मोहम्मद सिराजने २० षटकात ७३ धावांमध्ये ५ बळी घेतले. मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क आणि जोश हेजलवूड असे पाच बळी त्याने टिपले. हेजलवूड बाद होताच भारतीय खेळाडू पॅव्हेलियनकडे परत जात असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने मनाचा मोठेपणा दाखवत स्वत: पंचांशी संवाद साधला. सिराजने प्रथमच एका डावात पाच बळी मिळवण्याची किमया साधली. त्यामुळे अजिंक्यने तो चेंडू पंचांकडून मागून सिराजला सोपविला. सिराजने उपस्थित एक हजार प्रेक्षकांना चेंडू दाखवून त्यांचे अभिवादन स्वीकारले.

धावफलक - 
ऑस्ट्रेलिया पहिला डाव : ३६९ धावा. भारत पहिला डाव : ३३६ धावा. ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : मार्कस हॅरिस झे. पंत गो. ठाकूर ३८, डेव्हिड वॉर्नर पायचित गो.सुंदर ४८, मार्नस लाबुशेन झे.शर्मा गो.सिराज २५,स्टीव्ह स्मिथ झे. रहाणे गो. सिराज ५५, मॅथ्यू वेड झे.पंत गो.सिराज ००, कॅमरुन ग्रीन झे. शर्मा गो. ठाकूर ३७,टिम पेन झे. पंत गो. ठाकूर२७, पॅट कमिन्स नाबाद २८, मिशेल स्टार्क झे. सैनी गो. सिराज १, नाथन लियोन झे. अग्रवाल गो. ठाकूर १३, जोश हेजलवुड झे. ठाकूर गो. सिराज ९. अवांतर : १३,एकूण : ७५.५ षटकात सर्व बाद २९४ धावा, गडी बाद क्रम: १/८९, २/९१, ३/१२३, ४/१२३, ५/१९६, ६/२२७, ७/२२७, ८/२४७, ९/२७४, १०/२९४. गोलंदाजी: सिराज १९.५-५-७३-५, नटराजन १४-४-३९-०, सुंदर १८-१-८०-१, ठाकूर १९-२-६१-४, सैनी ५-१-३२-०. 
भारत दुसरा डाव : रोहित शर्मा नाबाद ४, शुभमन गिल नाबाद ००, एकूण: १.५ षटकात बिनबाद ४ धावा. गोलंदाजी : स्टार्क १-०-४-०, हेजलवुड ०.५-०-०-०.

Web Title: 4th Test: India wants 328 run for victory, Australia all out on 294

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.