भारतीय क्रिकेटमधील उगवता तारा वैभव सूर्यवंशी याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंडर-१९ पहिल्या युवा एकदिवसीय सामन्यात मैदानावर पाऊल ठेवताच जागतिक क्रिकेटमध्ये खळबळ उडवून दिली. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी भारतीय १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करत त्याने १९ वर्षे जुना जागतिक विक्रम मोडीत काढला.
शनिवारी, ३ जानेवारी रोजी बेनोनी येथील विलोमूर पार्क येथे झालेल्या या सामन्यात वैभव सूर्यवंशी हा कोणत्याही फॉरमॅटमध्ये आंतरराष्ट्रीय १९ वर्षांखालील संघाचे नेतृत्व करणारा जगातील सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. १६ वर्षांच्या वयाआधी हे शिखर सर करणारा तो पहिलाच क्रिकेटपटू आहे. या कामगिरीसह त्याने पाकिस्तानच्या अहमद शहजादचा १९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत काढून इतिहासाच्या पानात आपले नाव कोरले.
युवा भारतीय संघाचा नियमित कर्णधार आयुष म्हात्रे आणि उपकर्णधार विहान मल्होत्रा हे दोघेही दुखापतग्रस्त झाल्यामुळे या तीन सामन्यांच्या मालिकेची धुरा वैभवच्या खांद्यावर सोपवण्यात आली. जरी तो पहिल्या सामन्यात फलंदाजीत विशेष चमक दाखवू शकला नसला (१२ चेंडूत ११ धावा), तरी कर्णधार म्हणून त्याची ही उपस्थिती भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील मोठ्या बदलाची नांदी मानली जात आहे.
वैभव सूर्यवंशी हे नाव केवळ कर्णधारपदासाठी नाही, तर त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखले जाते. विजय हजारे ट्रॉफीमध्ये बिहारकडून खेळताना त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध अवघ्या ३६ चेंडूत शतक ठोकले होते. त्या सामन्यात त्याने ८४ चेंडूत १९० धावा केल्या. यादरम्यान त्याने लिस्ट 'ए' क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० धावा करण्याचा दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सचा विक्रम १० चेंडू राखून मोडला. त्याने एका डावात १५ षटकार मारण्याचा विक्रम केला. हा विक्रम कोणत्याही भारतीय फलंदाजासाठी लिस्ट 'ए' फॉरमॅटमधील सर्वोच्च आहे.