छ. संभाजीनगरातील आकाशवाणी चौक का खुला केला? निवडणूक आयोगाकडून प्रशासनास विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 18:56 IST2026-01-12T18:55:33+5:302026-01-12T18:56:12+5:30
राज्य निवडणूक आयोगाने रविवारी पोलिस आयुक्त आणि मनपा प्रशासक यांच्याकडून अहवाल मागविल्याची माहिती सुत्रांनी दिली.

छ. संभाजीनगरातील आकाशवाणी चौक का खुला केला? निवडणूक आयोगाकडून प्रशासनास विचारणा
छत्रपती संभाजीनगर : शहराची लाइफलाइन असलेला जालना रोडवरील आकाशवाणी चौक शुक्रवार, दि. ९ जानेवारी रोजी नागरिकांसाठी खुला करण्यात आला. त्यामुळे दिवसभर या चौकात वाहतूक कोंडी होत आहे. हजारो वाहनचालकांना याचा मन:स्ताप सहन करावा लागतोय. ‘लोकमत’ने यासंदर्भात शनिवार व रविवारी सविस्तर वृत प्रकाशीत केले. रविवारी राज्य निवडणूक आयोगाने पोलिस आणि महापालिका प्रशासनाला चौक खुला का केला, यासंदर्भात खुलासा मागविल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली. यासाठी राजकीय दबाव होता का? अशी विचारणा आयोगाने केली आहे.
जवाहर कॉलनी, त्रिमूर्ती चौकाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना सेव्हन हिल चौकापर्यंत येऊन परत आकाशवाणीकडे जावे लागत होते. मागील अनेक महिन्यांपासून चौक खुला करावा, अशी मागणी करण्यात येत होती. या चौकात काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. वाहनचालकांची सुरक्षा डोळ्यासमोर ठेवून पोलिस प्रशासनाने चौक बंद केला. त्यानंतर या चौकात एकही अपघात झाला नाही. दिवसभर बंद ठेवून रात्री १०:०० वाजेनंतर तो खुला करण्यात येतो. शिंदेसेनेच्या उमेदवारांनी चौक खुला करण्यासाठी आपल्या नेत्यांना विनंती केली. नेत्यांनीही पोलिसांना सांगून चौक शुक्रवारी खुला केला. त्यानंतर सेव्हन हिलपासून मोंढानाक्यापर्यंत वाहनांची प्रचंड कोंडी होत आहे. विरूद्ध दिशेला मोंढानाका ते सेव्हन हिलपर्यंत हीच स्थिती आहे. या वाहतूक कोंडीला सर्वसामान्य नागरिक प्रचंड कंटाळले आहेत. चौक पूर्वीसारखा बंद करावा, अशी मागणी वाहनचालकांकडून सातत्याने होत आहे. मात्र, निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पोलिस चौक बंद करायला तयार नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ सातत्याने वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा त्रास, अशा पद्धतीने चौक उघडता येतो का? असे वृत्त प्रकाशित करून वस्तुस्थिती मांडत आहे.
आयोगाने घेतली घटनेची दखल
राज्य निवडणूक आयोगाने रविवारी पोलिस आयुक्त आणि मनपा प्रशासक यांच्याकडून अहवाल मागविल्याची माहिती सुत्रांनी दिली.