भाजप-शिंदेसेना युती नेमकी कुणाला नकोय? छत्रपती संभाजीनगरमध्ये चार बैठका निष्फळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 14:28 IST2025-12-24T14:26:22+5:302025-12-24T14:28:59+5:30
महायुती तोडण्यासाठी शिंदेसेनेकडून गडबड : भाजप; भाजपमधील काही नेते आततायीपणा करीत आहे : शिंदेसेना

भाजप-शिंदेसेना युती नेमकी कुणाला नकोय? छत्रपती संभाजीनगरमध्ये चार बैठका निष्फळ
छत्रपती संभाजीनगर : भाजप-शिवसेनेसह घटक पक्षांची महायुती महापालिका निवडणुकीत एकत्रपणे मैदानात उतरण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चालली आहे. महायुतीसाठी झालेल्या चार बैठकांतून काहीही ठोस निर्णय झाला नाही. महायुतीला तेच ‘ब्रेक’ लावल्याचा आरोप दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर करत असल्याने महायुती कुणाला नकोय? अशी चर्चाही जनमानसात सुरू झाली आहे.
महायुतीसाठी नेमलेल्या चार सदस्यीय समितीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. त्या समितीत सगळे लिंबूटिंबू सदस्य आहेत. खरा निर्णय मंत्री, आमदारांच्या बैठकीनंतरच होणार असल्यामुळे सध्या फक्त चर्चेचे गुऱ्हाळ सुरू असून वेगवेगळी वक्तव्ये दोन्ही बाजूंनी केली जात आहेत.
शिंदेसेना व भाजपमध्ये सध्या जोरदार इनकमिंग सुरू आहे. उमेदवारीचा शब्द मिळत असल्याने अनेकांचे पक्षात प्रवेश होत आहेत. यामुळे पक्षातील मूळ कार्यकर्ते नाराज होत असून ते मंत्री, आमदारांना भेटत आहेत. त्यांना दोन्ही पक्षांतील मंत्री, आमदार उडवून लावत असल्यामुळे इच्छुक पाणावलेल्या डोळ्यांनी प्रचार कार्यालये सोडत आहेत.
महायुतीचे गुऱ्हाळ माध्यमातच...
महापालिका निवडणुकीसाठी महायुती करण्याचे गुऱ्हाळ फक्त माध्यमांमध्येच चर्चेत आहे. भाजपचे मंत्री, नेते गोड-गोड बोलतात, तर काही नेते युती तुटेल असे वक्तव्य करतात.
शिंदेसेनेत देखील असाच प्रकार सुरू आहे. मंत्री कडक वक्तव्ये करतात, तर कोअर कमिटीचे सदस्य युतीच्या बाजूने बोलतात. हा सगळा प्रकार कार्यकर्त्यांची, इच्छुकांची मजा घेणारा असल्याचे दिसते आहे.
बंडखोरी होण्याची सर्व पक्षांना भीती असल्यामुळे बैठकींचा फार्स सुरू आहे.
शिंदेसेनेकडूनच युती तोडण्याची गडबड....
पालकमंत्री संजय शिरसाट हे महायुतीच्या कोअर कमिटीचे जबाबदार नेते आहेत. त्यामुळे त्यांनी युतीच्या आचारसंहितेचे पालन करणे गरजेचे आहे. महायुतीचा निर्णय होण्यापूर्वीच ते गडबड करीत आहेत. त्यांची गडबड ही युती तोडण्यासाठी असल्याचे दिसत आहे. आमच्या कार्यकर्त्यांचे प्राबल्य असलेल्या प्रभागात त्याला न्याय देण्याची आमची भूमिका आहे. त्या भूमिकेतून चर्चा झाली तर युती करू.
- आ. संजय केणेकर....
भाजपच्या अवास्तव मागण्यांमुळे जागावाटपाचा पेच कायम : पालकमंत्री संजय शिरसाट
छत्रपती संभाजीनगर : महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युती करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. यामुळे आम्ही भाजपसोबत जागावाटपासंदर्भात चार बैठका घेतल्या. मात्र, त्यांच्याकडून जागांची अवास्तव मागणी होत असल्याने जागावाटपाचा पेच कायम असल्याचे शिंदेसेनेचे नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी मंगळवारी सकाळी येथे पत्रकारांना सांगितले.
शिरसाट म्हणाले की, शहर महापालिकेत भाजप-सेनेची युती व्हावी, यासाठी आमचा प्रयत्न आहे. यामुळेच आम्ही मागील काही दिवसांपासून भाजपसोबत जागा वाटपासाठी प्रयत्न करीत आहोत. मात्र, आमची ताकद वाढली आहे, असे सांगून ते विविध जागांवर दावा करीत आहेत. भाजपकडून होत असलेल्या जागांची अवास्तव मागणीमुळे आजपर्यंत जागावाटपाचा तिढा सुटला नाही. ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे यांच्यासोबत अंतिम बैठक घेऊन, यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल. मात्र, यात यश न आल्यास दोन्ही पक्षांचे वरिष्ठ युतीसंदर्भात निर्णय घेतील. आम्हाला भांडण उकरून काढायचे नाही, म्हणून आम्ही शांत आहोत, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.
ठाकरे बंधूंचा जीव मुंबई मनपात अडकला
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू मनपा निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत, याकडे लक्ष वेधले असता शिरसाट म्हणाले की, ठाकरे बंधूंचा जीव मुंबई मनपामध्ये अडकला आहे. कारण केवळ टक्केवारीच्या स्वार्थासाठी ते मजबुरीतून एकत्र आल्याचा आरोप शिरसाट यांनी केला. त्यांच्यासाठी मुंबई मनपा ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याचेही ते म्हणाले.