जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

By राम शिनगारे | Published: April 25, 2024 07:40 PM2024-04-25T19:40:19+5:302024-04-25T19:40:50+5:30

पीपल्स मेनिफेस्टो: मराठवाडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास आहे.

When will world class educational institutions come to Marathwada? Why not institutes like IITs, IIMs, AIIMS? | जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

जागतिक दर्जाच्या शिक्षणसंस्था कधी येणार मराठवाड्यात? आयआयटी,आयआयएम,एम्स का नाहीत?

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याचा शैक्षणिक मागासलेपणा दूर करण्यासाठी अस्तित्वातील शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासह एम्स, आयआयटी, आयआयएम, एनआयटी, ट्रीपल आयटीसारख्या जागतिक पातळीवर नावाजलेल्या संस्था सुरू झाल्या पाहिजेत. २०१४ साली आयआयएम छत्रपती संभाजीनगरमध्ये स्थापन करण्याचा निर्णय झाला होता; मात्र, राजकीय पाठबळाअभावी ही संस्था नागपूरला स्थलांतरित झाली. सक्षम राजकीय नेतृत्वाच्या अभावी मराठवाड्याचे शैक्षणिक मागासलेपण कायम राहिले असल्याचे दिसून येते.

मराठवाडा स्वातंत्र्यपूर्व काळापासून शैक्षणिकदृष्ट्या अतिमागास आहे. स्वातंत्र्यानंतर या भागात शिक्षणासाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली. त्यापूर्वी स्वामी रामानंद तीर्थ यांनी अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षणसंस्था सुरू केली. मात्र, स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला तरीही मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगरचा शैक्षणिक अनुशेष अद्याप भरून निघालेला नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठ, नांदेड येथे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यरत आहेत. या सार्वजनिक विद्यापीठांची काही उपकेंद्रेही उभारली आहेत. मात्र, त्यांना अद्यापपर्यंत सक्षम बनवलेले नाही. या संस्था सक्षम बनविण्यासाठी लागणारी राजकीय इच्छाशक्तीच राजकीय नेत्यांनी आतापर्यंत दाखवली नाही. त्यातच मागासलेपणा दूर करण्यासाठी आयआयटी, आयआयएम, ट्रीपल आयटी, एनआयटी, नायपर, केंद्रीय विद्यापीठांसारख्या राष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या शिक्षणसंस्था मराठवाड्यात स्थापन करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात येते. २०१४ साली आयआयएम संस्थेची स्थापना छत्रपती संभाजीनगरात होणार होती. मात्र, ऐनवेळी ही संस्था नागपूरला पळवून नेली. सक्षम राजकीय नेतृत्व, इच्छाशक्तीच्या अभावामुळे मराठवाडा शैक्षणिकदृष्ट्या मागास राहिला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठवाड्यातील रखडलेले शैक्षणिक प्रकल्प
मराठवाड्यात स्थापन होणारी आयआयएम संस्था नागपूरला गेल्यानंतर स्कूल ऑफ प्लॅनिंग ॲण्ड आर्किटेक्चर (एसपीए) संस्था छत्रपती संभाजीनगरात स्थापन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. त्यास १० वर्ष उलटले तरी निर्णय झालाच नाही. छत्रपती संभाजीनगरात क्रीडा विद्यापीठासाठी जमीन शोधली होती. त्यानंतर हे विद्यापीठ पुण्याला हलविण्यात आले. मराठी भाषा विद्यापीठ अंबाजोगाई येथे स्थापन होणार होते, मात्र ते शेवटी विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील ऋधिपूर येथे स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला. पैठण येथे संतपीठ सुरू करण्यात आले, मात्र शासनाने अद्यापपर्यंत निधीच दिलेला नाही. विद्यापीठाच्या फंडातून तात्पुरते संतपीठ सुरू आहे. त्याशिवाय छत्रपती संभाजीनगरातील महाराष्ट्र राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या विकासासाठी आवश्यक निधी शासनाकडून वेळेवर उपलब्ध होत नाही. स्पाेर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडिया (साई) चे विभागीय केंद्रही पळविण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून सुरू झालेला आहे.

सर्वाधिक खासगी संस्थांच्या शाळा
मराठवाड्यात राज्यातील सर्वाधिक खासगी शिक्षणसंस्थांच्या शाळा कार्यरत आहेत. मात्र, या संस्था सक्षम बनविण्यासाठी २००४ पासून शासनाकडून कोणतेही अनुदान मिळालेले नाही. एवढेच काय शिक्षकेतर अनुदानही २००४ पासून बंद करण्यात आलेले आहे. त्यामुळे मराठवाड्याचा प्राथमिक शिक्षणाचाही मोठा अनुशेष कायम राहिला आहे.

सरकारी नोकरीतील प्रमाण अत्यल्प
लोकसंख्येच्या तुलनेत मराठवाड्यातील तरुणांचे सरकारी नोकरीतील प्रमाण १६ टक्के एवढे असायला पाहिजे. मात्र सद्यस्थितीत हे प्रमाण फक्त ४ टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे मराठवाड्यात स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची स्थापना करावी लागेल. तसेच नोकरीतील अनुशेष भरून काढण्यासाठीही वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील.

Web Title: When will world class educational institutions come to Marathwada? Why not institutes like IITs, IIMs, AIIMS?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.