मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 18:32 IST2024-11-21T18:30:47+5:302024-11-21T18:32:40+5:30
मतदान प्रकियेत अडथळा आणून व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे पडले महागात

मतदान केंद्राचे केले व्हिडिओ रेकॉर्डिंग; अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणेंवर गुन्हा दाखल
खुलताबाद: खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर व कनकशीळ मतदान केंद्रात ईव्हीएम मशीनची मांडणी चूक असल्याचे म्हणत अपक्ष उमेदवार सुरेश सोनवणे यांनी व्हिडिओ शुंटींग केले. यावेळी मतदान प्रक्रिया काही काळ ठप्प होती. निवडणुकीत मतदान प्रकियेत बाधा निर्माण केल्याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा गंगापूर- खुलताबाद मतदार संघाचे अपक्ष उमेदवार सोनवणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२० नोव्हेंबर बुधवार रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी विधानसभा मतदारसंघ गंगापूर येथे मतदान केंद्र क्रमांक ८७ सुलतानपूर, तालुका खुलताबाद येथे अपक्ष उमेदवार सुरेश साहेबराव सोनवणे यांनी सकाळी ८:४५ च्या सुमारास मतदान केंद्राच्या आत प्रवेश केला. त्यानंतर बीयू मांडणी पाहणी केली व ही मांडणी चुक आहे असे सांगितले. तसेच केंद्रात मोबाईल नेण्यास बंदी असतानाही मोबाईल सोबत नेऊन बीयू व व्हीव्हीपॅट कक्षात व्हिडिओ रेकॉर्डिंग केली. तसेच हा व्हिडिओ व्हाट्सअॅपवर प्रसारित केला. यात मतदान प्रक्रिया दहा मिनिटे ठप्प होती. त्याचबरोबर मतदान केंद्र क्रमांक ५१ कनकशिळ ( तालुका खुलताबाद) येथे देखील अपक्ष उमेदवार सोनवणे यांनी सकाळी ९:५६ च्या सुमारास जात संपूर्ण मतदान केंद्राचे व्हिडिओ शूटिंग केले.
सदरील दोन्ही घटनाकरिता अपक्ष उमेदवार सुरेश साहेबराव सोनवणे यांच्यावर लोकप्रतिनिधी नियम १९५१ चे कलम 130 ,132 व भारतीय न्याय सुरक्षा संहितेचे कलम 163 नुसार बुधवारी रात्री खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय फराटे हे करत आहेत.