"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 12:24 IST2026-01-15T12:21:48+5:302026-01-15T12:24:15+5:30
"नगरसेवक कोणीही होवो, त्यांच्याकडून काम करून घेणं माझी जबाबदारी!" मतदानानंतर मंत्री संजय शिरसाठ यांचे महत्त्वपूर्ण विधान.

"निवडून येणारे लोकसेवक असावेत, मालक नव्हे!"; संजय शिरसाठ यांचे विरोधकांना खडे बोल
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आज सकाळी मंत्री संजय शिरसाठ यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत, नवीन निवडून येणाऱ्या नगरसेवकांकडून दर्जेदार काम करून घेणे ही आपली नैतिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
ईव्हीएम बिघाड आणि 'मार्कर'चा वाद
शहरातील काही केंद्रांवर ईव्हीएम मशीन बंद पडल्याच्या घटनांवर शिरसाठ म्हणाले की, "इतक्या मोठ्या यंत्रणेत तांत्रिक बिघाड होणे नवीन नाही. विधानसभा आणि लोकसभेलाही असे होते. मात्र, निवडणूक प्रमुखांनी यात तातडीने सुधारणा केली असून यंत्रणा आता सुरळीत आहे." मात्र, मतदारांच्या बोटाला लावल्या जाणाऱ्या शाईबद्दल त्यांनी आक्षेप घेतला. "काही ठिकाणी मार्कर पेनने शाही लावली जात आहे, जी सहज निघू शकते. यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अधिकाऱ्यांनी यावर कडक लक्ष द्यावे," अशी मागणी त्यांनी केली.
विरोधकांना सूचक इशारा
राजकीय फटकेबाजी करताना शिरसाठ यांनी विरोधकांवर निशाणा साधला. "आपण लोकशाहीत जनतेचे सेवक आहोत, ही भावना सर्वांनी ठेवायला हवी. पण काही लोक आता 'मालकाच्या' भूमिकेत शिरले आहेत. अशा लोकांना जनता आपल्या पद्धतीने धडा शिकवेल," असा टोला त्यांनी लगावला. शहराच्या विकासासाठी बदल होणे गरजेचे असल्याचे सांगत, आगामी काळात छत्रपती संभाजीनगर शहर अधिक गतीने पुढे जाईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.