'...तर अंबादास दानवेंना सरळ करेल'; छ. संभाजीनगरमध्ये 'खैरे विरुद्ध दानवे' पुन्हा जुंपली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2026 14:14 IST2026-01-15T14:10:14+5:302026-01-15T14:14:55+5:30
मतदानानंतर चंद्रकांत खैरेंचा अंबादास दानवेंना इशारा

'...तर अंबादास दानवेंना सरळ करेल'; छ. संभाजीनगरमध्ये 'खैरे विरुद्ध दानवे' पुन्हा जुंपली!
छत्रपती संभाजीनगर: महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते चंद्रकांत खैरे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला आहे. "अंबादास दानवेला अक्कल नाही, तो माझ्यावर अविश्वास दाखवत असेल तर १६ तारखेनंतर मी त्याला सरळ करीन," अशा शब्दांत खैरेंनी स्वपक्षीय नेत्यावरच संताप व्यक्त केला आहे.
अंतर्गत वाद चव्हाट्यावर
खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "मी एकनिष्ठ माणूस आहे म्हणूनच आजवर टिकलो आहे. तुम्ही आतून काय केलंय हे मला चांगलं माहित आहे. दानवे गेल्या चार दिवसांपासून गायब आहे, आम्ही त्याला शोधतोय पण तो सापडत नाहीये. निकालांनंतर मी मोठी पत्रकार परिषद घेऊन सगळं उघड करणार आहे." या विधानामुळे ठाकरे गटातील अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर आली आहे.
भाजप आणि शिंदे गटावर 'पैसे वाटपा'चा आरोप
निवडणुकीत पारदर्शकता नसल्याचा दावा करत खैरेंनी भाजप आणि शिंदे गटावर गंभीर आरोप केले. "आशिष शेलार मुंबईतून आता तडीपार होणार आहेत. भाजप आणि शिंदे गटाचे लोक शहरात पैसे वाटप करून मतं विकत घेण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्ही जनतेची कामं का करत नाही? फक्त मतदानासाठी पैसे का देता?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच संजय शिरसाठ यांच्या 'तिळगुळ' वाटपाच्या दाव्याला त्यांनी 'राजकीय नाटक' म्हणत फेटाळून लावले.
९९ वर्षीय मातेसह मतदान
खैरेंनी आपल्या ९९ वर्षीय वृद्ध मातेसह आणि संपूर्ण परिवारासह मतदान केले. त्यानंतर राजकीय फटकेबाजी सुरू केली, "माझी आई ९९ वर्षांची आहे, तिला चालता येत नाही तरीही तिने बसून सर्व कामे पूर्ण केली आणि मतदानाला आली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्मरून आम्ही उद्धव आणि आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मतदान केले आहे," असे त्यांनी भावनिक होत सांगितले.