मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:58 IST2026-01-06T13:57:15+5:302026-01-06T13:58:57+5:30
छत्रपती संभाजीनगर नामकरण झाल्यानंतर महापालिकेत भगवा फडकणार, पहिला महापौर भाजपचाच!

मोबाईल रोज चार्ज करता, तसं मतदारांना रोज भेटा; भाजप प्रदेशाध्यक्ष चव्हाणांचा कार्यकर्त्यांना मंत्र
छत्रपती संभाजीनगर: "छत्रपती संभाजीनगर शहराचे ऐतिहासिक नामकरण झाल्यानंतर होणारी ही पहिलीच महानगरपालिका निवडणूक आहे. ही निवडणूक केवळ सत्तेसाठी नाही, तर शहराच्या अस्मितेसाठी आहे. त्यामुळे या नवीन नावाच्या महापालिकेत पहिला महापौर भाजपचाच बसवायचा आहे," असा ठाम निर्धार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज व्यक्त केला.
शहरातील भाजपच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयात आयोजित 'बुथ प्रमुख मेळाव्यात' ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना '५१ टक्के' मतदानाची लढाई जिंकण्याचे उद्दिष्ट दिले.
गतिमान सरकार आणि विकासाचा पाढा
आपल्या भाषणात चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामांचे कौतुक केले. "केंद्रातून येणारा १०० टक्के निधी आता थेट लोकांच्या खात्यात जमा होतो, भ्रष्टाचार थांबला आहे," असे ते म्हणाले. शहराच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर भाष्य करताना त्यांनी आश्वासन दिले की, "येत्या एक महिन्याच्या आत शहराचा पाणी प्रश्न मार्गी लागेल, हा शब्द मतदारांपर्यंत पोहोचवा."
कार्यकर्त्यांना विशेष संदेश
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी एक रंजक उदाहरण दिले. "जसा आपण आपला मोबाईल रोज चार्ज करतो, तसंच मतदारांना रोज भेटा. जोपर्यंत त्यांना पटत नाही, तोपर्यंत वारंवार योजनांची माहिती द्या. २०१४ पूर्वीचे लोडशेडिंग आणि आजची अखंड वीज यातील फरक लोकांना समजून सांगा," असे आवाहन त्यांनी केले. "तुम्ही फक्त एकदा कमळाचे बटन दाबा, पुढची पाच वर्षे देवेंद्र फडणवीस तुम्हाला सांभाळतील," असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. या मेळाव्याला भाजपचे जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष आणि मोठ्या संख्येने बुथ प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.