'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:53 IST2025-12-30T11:49:16+5:302025-12-30T11:53:13+5:30
अंतर्गत वाद आणि घराणेशाही नडल्याचा सावे-कराडांचा दावा

'घरातील लोकांना तिकीट हवं होतं म्हणून युती तोडली!'; भाजपचा शिंदेसेनेवर पलटवार
छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्याची घोषणा झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच भाजपने शिंदेसेनेच्या आरोपांवर पलटवार केला. "शिंदेसेनेला शहराच्या विकासापेक्षा घरातील मंडळींचे राजकीय पुनर्वसन करण्यात जास्त रस होता, म्हणूनच त्यांनी जाणीवपूर्वक युती तोडली," असा खळबळजनक आरोप राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे आणि माजी केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी केला आहे.
३७ जागांवर शिक्कामोर्तब झाले होते!
मंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात ३७ जागांच्या फॉर्म्युलावर एकमत झाले होते. मात्र, त्यानंतरही स्थानिक पातळीवर शिंदेसेनेच्या नेत्यांनी रोज नव्या मागण्या मांडल्या. "आमचे विद्यमान नगरसेवक असलेल्या जागांवर त्यांनी दावा केला. वैयक्तिक मंडळींना ॲडजस्ट करण्यासाठी प्रस्तावात वारंवार बदल सुचवले. आम्ही लवचिकता दाखवली, पण त्यांची भूक भागत नव्हती," असे सावे यांनी स्पष्ट केले.
'चार नेते, चार दिशा': भागवत कराड
खासदार भागवत कराड यांनी शिंदेसेनेच्या अंतर्गत विसंवादावर बोट ठेवले. "पालकमंत्री, खासदार, आमदार आणि जिल्हाध्यक्ष हे चौघेही कधीच एका विचाराने समोर आले नाहीत. चौघे चार वेगळ्या गोष्टी सांगायचे. त्यांच्यातील अंतर्गत वादामुळेच युतीचा बळी गेला आहे," असे कराड म्हणाले. तसेच, मतदार हुशार असून विकासाच्या मुद्द्यावर तो भाजपलाच कौल देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या आरोप-प्रत्यारोपामुळे आता महापालिकेत युतीचा धर्म संपून 'मैत्रीपूर्ण' लढतीऐवजी 'कट्टर' संघर्ष पाहायला मिळणार, हे आता निश्चित झाले आहे.