"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 11:19 IST2025-12-30T11:17:30+5:302025-12-30T11:19:01+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत आता 'स्वबळाचा' नारा

"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
छत्रपती संभाजीनगर: "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक चर्चा करूनही भाजपच्या स्थानिक नेत्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या वैयक्तिक अहंकारामुळे आणि हट्टापायी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटली आहे," अशा शब्दांत पालकमंत्री संजय शिरसाट यांनी भाजपवर हल्लाबोल केला. मागील १० दिवसांपासून सुरू असलेला जागावाटपाचा सस्पेन्स अखेर संपला असून दोन्ही पक्ष आता एकमेकांविरुद्ध मैदानात उतरणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचा शब्दही नाकारला?
शिरसाट यांनी पत्रकार परिषदेत भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर गंभीर ताशेरे ओढले. ते म्हणाले की, जागावाटपाचे सूत्र ठरलेले असतानाही भाजपने जाणूनबुजून तिढा निर्माण केला. "काही चुका झाल्या असतील तरीही भाजपने नवीन प्रस्ताव दिला नाही. केवळ 'थांबा आणि वाट पहा' असा निरोप देऊन वेळकाढूपणा केला," असा आरोप शिरसाट यांनी केला.
अहंकाराचा फटका
भाजपने आपल्या कार्यकर्त्यांना आधीच अर्ज भरण्यास सांगून युती धर्माचे पालन केले नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला. "आम्ही काहीही करू शकतो, हा भाजप नेत्यांचा अहंकार महायुतीला नडला आहे. आम्ही युती वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण आता आमच्याकडे स्वबळाशिवाय पर्याय उरलेला नाही," असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यासारख्या नाराज नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आता ताकद मिळणार असून, शहरातील राजकारण पूर्णपणे पालटले आहे.